कोल्हापूर : धरणांच्या पाणी पातळीवर पूर नियंत्रणाचे नियोजन

कोल्हापूर : सुनील सकटे : गेल्या काही वर्षांत जिल्ह्याला बसलेला महापुराचा तडाखा लक्षात घेऊन प्रमुख धरणांतील पाणी पातळी आणि पावसाळ्यात धरणात पाणी साठा किती करायचा, यावर संभाव्य महापुरावर नियंत्रण मिळविण्याचे सूक्ष्म नियोजन सुरू आहे. गेल्या वर्षी ऐन महापुरात धरणातून अजिबात पाणी सोडले नाही. त्याचप्रकारे पाटबंधारे विभाग आखणी करीत आहे.
पाटबंधारे विभागाने धरणातील पाणी पातळी कमीत कमी ठेवली. पाऊस लांबल्याने या पाण्याचे नियोजन करताना तारेवरील कसरत करावी लागली. धरणक्षेत्रासह सर्वच भागांत गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने तूर्त तरी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. आता संभाव्य पुराचा धोका कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
राधानगरी, काळम्मावाडी, वारणा, तुळशी या मोठ्या धरणांसह अन्य धरणांतील पाणीसाठ्याचे नियोजन सुरू आहे. पावसाचा अंदाज घेऊन या धरणांतील पाणी पातळी राखली जात आहे. ही पाणी पातळी कमी झाल्यानंतर धरणात पाणी साठविणे सोपे जाणार आहे. पावसाळ्यात धरणात पाणी साठवून धरणांतून पाणी सोडावे लागणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे.
प्रत्येक धरणावर वायरलेस सेटसह कर्मचारी तैनात केले आहेत. ताराबाई पार्क येथील कार्यालयात पूरनियंत्रण कक्ष सुरू आहे. त्याची सर्व माहिती जिल्हा आपत्ती व्यस्थापन कक्षात सतत दिली जात आहे. संभाव्य धोका उद्भवल्यास यांत्रिकी विभागाची पथके सज्ज आहेत.