पोलंडमधील युद्ध स्मारकास संभाजीराजेंनी केले अभिवादन | पुढारी

पोलंडमधील युद्ध स्मारकास संभाजीराजेंनी केले अभिवादन

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : पोलंडमधील वॉर्साच्या ‘माँटे कॅसिनो’ या युद्ध स्मारकाला भेट देऊन माजी खा. संभाजीराजे व सौ. संयोगीताराजे यांनी मंगळवारी अभिवादन केले.

पोलंडमधील भारताच्या राजदूत नग्मा मलिक व त्यांच्या सहकार्‍यांतर्फे या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. माँटे कॅसिनो युद्ध स्मारक म्हणजे 12 मीटर स्तंभरूपात असणारा संघर्ष व जखमांच्या खुणा लेऊन उभा असलेला, शीर नसलेला नाईकी देवतेचा पुतळा आहे. स्मारकापासून माँटे कॅसिनो टेकडी पूर्णपणे पाहता येते. माँटे कॅसिनोच्या भोवतीने 2 मीटरचा पादचारी मार्ग खोदण्यात आला आहे. तसेच तेथे युद्धात सहभागी झालेल्या 5 पोलिश युनिटस्ची प्रतीके, पोलिश गरूड आणि या युद्धवीरांची रक्षा असलेला कलश ठेवण्यात आला आहे. जवळच कृतज्ञतेचे स्मारकही (फलक) आहे.

भेटीवेळी कोल्हापूरच्या राजघराण्याप्रती असलेली कृतज्ञता आणि त्यांचा सन्मान म्हणून संभाजीराजे व सौ. संयोगीताराजे यांना बि—गेडियर जनरल टोमीझ डोमिनीकोवस्की यांच्या नेतृत्वाखालील पोलिश लष्कराच्या वॉर्सा गॅरिसनने ‘गार्ड ऑफ ऑनर’चा सन्मान दिला. यानंतर दाम्पत्यांनी पोलिश रिवाजानुसार तेथे पुष्पचक्र वाहिले. त्यानंतर संभाजीराजे यांनी ओशोटा येथील ‘गुड महाराजा’ चौकाला भेट दिली.

Back to top button