धुणी-भांडी करणार्‍या महिला ‘रेश्मा’च्या टार्गेट

धुणी-भांडी करणार्‍या महिला ‘रेश्मा’च्या टार्गेट
Published on
Updated on

इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा : 'रेश्मा'च्या पंधरा दिवसांत दामदुप्पट फंडात कोल्हापुरातील सिद्धार्थनगरमधील घरोघरी धुणीभांडी करणार्‍या महिलाही अडकल्या आहेत. येथील एकीला भरगच्च कमिशन देण्याचे आमिष दाखवून तिच्यामार्फत अन्य महिलांना आपल्या जाळ्यात अलगद खेचले आहे. येथील 70 ते 80 महिलांकडून 25 लाख रुपये उकळल्याचे आत्तापर्पंत समोर आले आहे. दोन वर्षांपासून तिच्याशी संपर्क तुटल्याने गुंतवणूक केलेल्या महिला हबकल्या आहेत.

दोन वर्षापूर्वी येथील एका बोलक्या महिलेला 'रेश्मा'ने हेरले. तिला कमिशनची चटक लावून तिच्या माध्यमातून अन्य महिलांशी संपर्क वाढवला. महिलांना एकत्र करण्याच्या अटीवर घसघशीत कमिशन देऊ केले. तिच्या माध्यमातून महिलांकडून पैसे उकळले. विश्वास संपादन करण्यासाठी काही महिलांना पैसे दिल्याचे नाटकही केले. पैसे दुप्पट परत मिळतात याची खात्री पटल्यानंतर म्होरक्या म्हणून नेमणूक केलेल्या महिलेकडे पैसे जमा करण्यासाठी रीघच लागली.

बघता बघता 70 ते 80 महिलांनी पैसे जमा केले. काही महिलांनी तर मुलगी, जावई, आई, वडील नातेवाईकांकडून तीस ते चाळीस हजार रुपये जमा केले. बर्‍यापैकी रक्कम जमा झाल्यानंतर 'रेश्मा'ने पोबारा केला. गेल्या दोन वर्षांपासून सिद्धार्थनगरमधील महिला कामधंदा सोडून हिचा शोध घेत होत्या. इचलकरंजीजवळील चंदूर रोडवरील तिच्या घराकडे चकरा मारल्या. तिच्या आईकडे विचारणा केली. मात्र घरच्यांनीही तिचा थांगपत्ता लागू दिला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलांचा धीर खचला. महिनाभरापूर्वी वृत्तपत्रातून 'रेश्मा'चे फोटे झळकल्यानंतर फसवणूक झालेल्या महिलांनी पुन्हा चंदूरची वाट धरली.

चेक बाऊन्स

गुंतवलेल्या पैशाचा परतावा म्हणून रेश्माने सुजाता कांबळे या महिलेस 7 लाख 23 हजाराचा युनियन बँक शिवाजी चौक, कोल्हापूर शाखेचा चेक दिला होता. मात्र तो बॅलन्स नसल्याने बाऊन्स झाला. त्याचवेळी दुसर्‍या महिलेला आणखी एक चेक दिला होता. गंमत म्हणजे एका चेकवर रेश्मा नदाफ अशी मराठीत तर दुसर्‍यावर इंग्रजीमध्ये सही आहे.

'रेश्मा'शी मोबाईलवरून संपर्क

यातील काही महिलांनी 'रेश्मा'चा मोबाईल नंबर मिळवून विचारणा केली. फोनवरूनही तिने पैसे चुकते करण्याची ग्वाही दिली होती. मात्र महिन्यानंतरही पैसे मिळाले नाहीत. आता 'रेश्मा'चा मोबाईल नॉट रिचेबल आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news