कोल्‍हापूर : पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ, २२ बंधारे पाण्याखाली | पुढारी

कोल्‍हापूर : पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ, २२ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी (दि. ५) पावसाचा जोर कायम राहिला. दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे जनजीवनही विस्कळीत झाले. कालच्या तुमनेत पंचगंगा नदीची पाणीपातळी मंगळवारी संध्याकाळी ७:००  वाजेपर्यंत वाढली. त्यामुळे जिल्ह्यातील २२ बंधारे पाण्याखाली गेले. राधानगरी धरणात ७८.८० दलघमी पाणीसाठा आहे.  सध्या  राजाराम बंधाऱ्यावर पाणी पातळी ही २७ फूट इंच इतकी आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी ही ३९ फूट व धोका पातळी ही ४३ फूट इतकी आहे.

पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ,भोगावती नदीवरील-हळदी व सरकारी कोगे, कासारी नदीवरील-वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण,ठाणे आळवे, कुंभेवाडी, कांटे, करंजफेण, पेंडाखळे व बाजारभोगाव, कुंभी नदीवरील-मांडूकली व शेणवडे बंधारे पाण्याखाली गेल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने आपल्या ट्विटर अकौंटवरून सांगितले आहे.

दरम्यान, मुसळधार पाऊस पडत असताना अनावश्यक घराबाहेर पडू नका. वीजा चमकत असताना झाडाखाली, पत्र्याच्या शेडखाली थांबू नका. जिल्ह्यात संततधार पावसामुळे होणाऱ्या संभाव्य पूरपरिस्थितीत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. जिल्हा प्रशासनाच्या आपत्कालीन विभागाशी संपर्क साधवा, असे आवाहन राहुल रेखावार यांनी नागरिकांना केले आहे.

कोल्हापूर-खारेपाटण मार्गावर भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. बर्की (ता. शाहूवाडी) येथे अडकलेल्या ८० पर्यटकांची सुटका करण्यात आली. हवामान विभागाने शुक्रवार, दि. ८ पर्यंत जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यामुळे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दक्षतेचे आदेश दिले.

Back to top button