कोल्हापूर : अन्वीकडून कळसूबाई शिखर सर | पुढारी

कोल्हापूर : अन्वीकडून कळसूबाई शिखर सर

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : खेळण्या-बागडण्याच्या वयात लहानग्या अन्वी चेतन घाटगे हिने महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसूबाई शिखर सर करण्याची विशेष कामगिरी बजावली आहे. केवळ 2 वर्षे 11 महिने वय असणार्‍या अन्वीने भर पावसात 1646 मीटर उंचीचे हे शिखर केवळ सव्वातीन तासांत पूर्ण केले.

अन्वीची आई अनिता घाटगे व पोलिस अंमलदार असणारे तिचे वडील चेतन घाटगे यांनीही ट्रेकिंगसोबत पर्यावरण रक्षणाचे अनेक उपक्रम आतापर्यंत राबविले आहेत. या दोघांनीही अन्वीला तिच्या वयाच्या अठराव्या महिन्यापासून ट्रेकिंगला नेण्यास सुरुवात केली. अन्वीने पहिला ट्रेक पन्हाळा ते पावनखिंड या मार्गावर केला. नुकतेच तिने अहमदनगर जिल्ह्यातील बारी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कळसूबाई शिखर सर केले. सर्वात लहान ट्रेकर असल्याबाबत या ग्रामपंचायतीच्या वतीनेही तिचा विशेष सन्मान करण्यात आला.

अन्वीची आतापर्यंत पावनगड, वेसरफ ते जंगल (13 कि.मी.), नेज डोंगर (ता. हातकणंगले), सादळे मादळे डोंगर, मोरजाई, बोरबेट डोंगर, गगनबावडा 560 पायर्‍या व पठार ट्रेक, बाहुबली डोंगर, शिवगड, दाजीपूर, पोहाळे जांभा खडक रॉक क्लिंबिंग अशा मोहिमा फत्ते केल्या आहेत. याबद्दल कृष्णा फौंडेशनकडून साहस गौरव पुरस्कार 2022 देऊन तिचा गौरव करण्यात आला असल्याची माहिती कोल्हापूर हायकर्सचे अध्यक्ष सागर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Back to top button