कोल्हापूर : 43 गावांसाठी लाकडी नावा तयार | पुढारी

कोल्हापूर : 43 गावांसाठी लाकडी नावा तयार

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या वतीने 43 ठिकाणी हाताने वल्हविण्यात येणार्‍या नावा तयार ठेवण्यात आल्या आहेत. आता आणखी काही नवीन गावांकडून नावांची मागणी होत असून त्याची तयारी जिल्हा परिषदेच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. यावर्षी जिल्हा परिषदेच्या वतीने साधारणपणे 15 ते 18 लाख रुपये खर्चून सात नवीन नावा खरेदी केल्या आहेत.

पूरग्रस्त गावांमध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने लाकडी नावा उपलब्ध करून दिल्या जातात. यासाठी ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागितले जातात. यावर्षी सहा गावांना नवीन बोटी देण्यात आल्या आहेत. यामध्ये शिरोळ तालुक्यातील गावांची संख्या अधिक आहे. शिरोळमधील धरणगुत्ती, कवठेसार, गणेशवाडी व शेडशाळ या चार गावांसह डोणेवाडी (गडहिंग्लज) व कोलोली (पन्हाळा) यांना यावर्षी नवीन नावा देण्यात आल्या आहेत. यावर्षी नृसिंहवाडी ग्रामपंचायतींने आणखी एका नावेची मागणी केली आहे.

शिरोळ तालुक्यातील सर्वाधिक 17 गावांना लाकडी नावा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये बस्तवाड, आलास, शिरढोण, खिद्रापूर, कनवाड, धरणगुत्ती, राजापूरवाडी, नृसिंहवाडी, कवठेसार, कुटवाड, आकिवाट, घालवाड, हसूर, कवठेगुलंद, गणेशवाडी, जुने दानवाड, राजापूर या गावांचा समावेश आहे.

हातकणंगले तालुक्यातील घुणकी, निलेवाडी, चंदूर, खोची व चावरे यांचा समावेश आहे. याशिवाय कसबा बीड, गाडेगोंडवाडी, हसूर (करवीर), डोणवाडी, कौलगे, हिटणी (गडहिंग्लज), कालकुंद्री व धुमडेवाडी (चंदगड), कसबा ठाणे, नणुंद्रे, बोरगाव पैकी देसाईवाडी, देवठाणे, कोलोली व परखंदळे-गोठे (पन्हाळा), वेतवडे (गगनबावडा), चिखली, बेलवडे बुद्रूक (कागल), येळवडे, आवळी बुद्रुक (राधानगरी) व शाहूवाडी तालुक्यातील कापशी व थेरगाव या गावांमध्ये लाकडी बोट आहे.

Back to top button