पन्हाळगड ते पावनखिंड : इथे सांडले रक्त, देई तुम्हा आव्हान..! | पुढारी

पन्हाळगड ते पावनखिंड : इथे सांडले रक्त, देई तुम्हा आव्हान..!

कोल्हापूर : सागर यादव : 12 व 13 जुलै 1660 या दिवशी पन्हाळगड ते विशाळगड या सह्याद्री पर्वत रांगेतील मार्गावर प्रचंड रणकंदन घडले. शिवछत्रपती व त्यांनी निर्माण केलेल्या रयतेच्या स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्याच्या रक्षणार्थ अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. मावळ्यांच्या जाज्वल्य पराक्रमी इतिहासाला अभिवादन करण्यासाठी आणि हा वारसा भावी पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने विविध शिवभक्त-इतिहासप्रेमी संस्था- संघटनांच्या वतीने जुलै महिन्यात ‘पन्हाळगड ते पावनखिंड’ या साहसी पदभ—मंती मोहिमेचे आयोजन केले जाते. कोरोनामुळे गेली दोन वर्षे थांबलेल्या मोहिमा यंदा पूर्ववत सुरू होत असल्याने आबालवृद्धांत उत्साहाचे वातावरण आहे.

शिवकालीन इतिहासाचा मागोवा

पन्हाळगडाला पडलेला सिद्दी जौहरचा वेढा शिताफीने फोडून शिवछत्रपती व त्यांच्या मावळ्यांनी रात्रीच्या अंधारात, धुँवाधार पावसात सह्यादीच्या डोंगर-कपारीच्या मार्गावरून वार्‍याच्या वेगाने विशाळगडाकडे कूच केली. या मार्गावर चौकेवाडी (सध्याचे पांढरेपाणी) ते भाततळी या सुमारे 6 कि.मी. परिसरात शिवछत्रपतींच्या बांदल-मराठा आणि सिद्दीच्या हजारोंच्या सैन्यात घनघोर लढाई झाली. पावनखिंड पसिरात शत्रूला रोखून शिवछत्रपतींना सहीसलामत विशाळगडावर पोहोचविण्यात मावळ्यांना यश आले.

असा आहे मोहिमेचा खडतर मार्ग

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व सामाजिक परंपरा असणार्‍या आषाढी एकादशीच्या पंढरपूर वारीप्रमाणे शिवछत्रपतींच्या लढवय्या इतिहासातही ‘पन्हाळगड ते पावनखिंड’ अशी साहसी पदभ—मंतीची धारकर्‍यांची वारी म्हणून नावारूपाला आली आहे. विविध संस्था, संघटनांतर्फे प्रतिवर्षी जुलै महिन्यात ‘पन्हाळगड ते पावनखिंड’ अशा साहसी पदभ—मंती मोहिमेचे आयोजन केले जाते. बोचरा वारा, प्रचंड पाऊस आणि सह्याद्री पर्वत रांगेतील काटे-कुटे, चिखल, दगड -धोंड्यांनी माखलेल्या खडतर डोंगर-दर्‍यांच्या मार्गावरून ही पदभ—मंती होते. सुमारे 70 किलोमीटरचा हा मार्ग आहे. इतिहासाच्या पाऊलखुणा शोधत रणभूमीचे पूजन, वीरांना अभिवादन, शिवछत्रपतींचा अखंड जयघोष, वीरश्री निर्माण करणारे शिवशाहिरांचे पोवाडे, इतिहासतज्ज्ञांचे मार्गदर्शन, शिवकालीन युद्धकलांची प्रात्यक्षिके अशा विविध कार्यक्रमांनी हा खडतर मार्गसुद्धा सुखकर होतो.

मोहिमेत दरवर्षी शेकडो गिर्यारोहकांचा सहभाग

निरर्व्यसनी, सशक्त, ध्येयवादी, देशप्रेमी युवा पिढी निर्माण व्हावी, त्यांच्याकडून इतिहासाचे जतन, संवर्धन आणि संरक्षणाचे कार्य घडावे, तसेच इतिहासाचा अनमोल वारसा भावी पिढीकडे सोपविण्याचे कर्तव्य पार पाडण्यासाठी त्यांनी सज्ज व्हावे अशा उद्देशाने इतिहासप्रेमी, शिवभक्त संस्था, संघटनांंकडून प्रतिवर्षी ‘पन्हाळगड ते पावनखिंड’ पदभ—मंतीचे आयोजन केले जाते. यात दरवर्षी मोहीमवीरांचा सहभाग वाढतच आहे.

असे आहे मोहिमांचे नियोजन…

संस्था-संघटना मोहिमेचा कालावधी
सह्याद्री प्रतिष्ठान ट्रस्ट, कोल्हापूर – 12 व 13 जुलै
आनंदराव पोवार युद्धकला प्रशिक्षण केंद्र – 9 व 10 जुलै
हिल रायडर्स अ‍ॅडव्हेंचर फाऊंडेशन – 16 / 23 / 30 जुलै
निसर्गवेध परिवार – 24 व 25 जुलै

मैत्रेय प्रतिष्ठान (एकदिवसीय) – 30 जुलै
शिवराष्ट्र हायकर्स – 9 ते 11 जुलै
इचलकरंजी गिरीभ—मण संघटना – 22 व 23 जुलै
कोल्हापूर हायकर्स – 16 व 17 जुलै
कोल्हापूर मर्दानी खेळ – 16 व 17 जुलै
स्वराज्य रक्षक शिवबाचा मावळा – 23 व 24 जुलै
मराठा हायकर्स, इचलकरंजी – 16 व 17 जुलै

Back to top button