भारतीय बाजारात सोन्याचे भाव प्रतितोळा 2 हजारांनी वाढणार? | पुढारी

भारतीय बाजारात सोन्याचे भाव प्रतितोळा 2 हजारांनी वाढणार?

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : डॉलर्सच्या तुलनेत रुपयाची घसरगुंडी रोखण्यासाठी केंद्राने सोन्यावरील आयात शुल्कामध्ये 5 टक्क्यांची वाढ केल्यामुळे बाजारात सोन्याचे दर प्रतितोळा सरासरी 2 हजार रुपयांपर्यंत वाढतील, असा अंदाज बाजारपेठेत व्यक्त केला जात आहे.

भारत सरकारने आयात शुल्कात वाढ केल्याने भारतीय बाजारात सोन्याच्या दराचा आलेख वाढता दिसत असला, तरी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा व्यवहार प्रतिऔस 1800 डॉलर्सच्या खालच्या पातळीवर होत आहेत. यामुळे बाजारपेठेतील हा दबाव कायम राहिला, तर ऑगस्टच्या उत्तरार्धात सोन्याचे भाव करवाढीपूर्वीच्या म्हणजेच प्रतितोळा 51 हजार 400 रुपयाच्या पातळीवर स्थिर होतील, असे एक अनुमान आहे.

भारतामध्ये महागाई भडकते आहे. आयात-निर्यातीमध्ये आयात वाढल्याने वित्तीय तूट मोठ्या प्रमाणात रुंदावते आहे. देशात होणार्‍या एकूण आयातीमध्ये सोन्याच्या आयातीचे स्थान वरच्या क्रमांकावर आहे. या आयातीचे व्यवहार रुपये आणि डॉलर्स यांच्या विनिमयातून होत असल्याने या आयातीला रोख लावण्यासाठी केंद्र सरकारने शुक्रवारी सोन्यावरील आयातीचे शुल्क साडेसात टक्क्यांवरून साडेबारा टक्क्यांवर नेले. या आयातीशिवाय देशांतर्गत सोन्याच्या व्यवहारावर 3 टक्क्यांचा वस्तू व सेवाकर आकारला जातो. त्यावरील सरचार्ज विचारात घेतला, तर सोन्यावरील कर 16.25 टक्क्यांवर पोहोचला आहे. या कराचा बाजारातील दरांवर किती परिणाम होईल, अशी चर्चा सोन्या-चांदीच्या बाजारपेठेमध्ये सुरू झाली आहे. यातील चर्चेचा सूर पाहता सरासरी प्रतितोळा 2 हजार रुपयांनी ही वाढ होईल, असा निष्कर्ष पुढे येतो आहे.

काही वर्षांत सोन्याची आयात वाढली

भारत हा सोने आयातीत प्रमुख देश म्हणून ओळखला जातो. देशांतर्गत सोन्याच्या खाणींमध्ये उत्पादन घटल्याने बाजारातील वाढत्या मागणीमुळे गेल्या काही वर्षांत सोन्याची आयात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात 34.62 बिलियन डॉलर्स (सुमारे 2 लाख 42 हजार 340 कोटी रुपये) इतकी झाली होती. तर 2021-22 या संपलेल्या आर्थिक वर्षात या आयातीत तब्बल 33.34 टक्क्यांची वाढ नोंदविली गेली. यामुळे सोन्याच्या आयातीवरील खर्च 46.14 बिलियन डॉलर्स (सुमारे 3 लाख 46 हजार कोटी रुपये) इतका गेला आहे.

Back to top button