कोल्हापूर : साने गुरुजी वसाहतमधील तरुण ट्रकच्या धडकेत ठार | पुढारी

कोल्हापूर : साने गुरुजी वसाहतमधील तरुण ट्रकच्या धडकेत ठार

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : अंबाई टँक ते क्रशर चौक रस्त्यावर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. आशुतोष सुनील देसाई (वय 20, रा. देशमुख हायस्कूलनजीक, सानेगुरुजी वसाहत) असे मृताचे नाव आहे. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात घडला. याप्रकरणी ट्रकचालक राजू माळीव (रा. गडमुडशिंगी) याच्याविरोधात जुना राजवाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

आशुतोष बीबीए शिक्षण घेत होता. सोमवारी रात्री दुचाकीवरून घरी येताना रंकाळ्याच्या पिछाडीस पतौडी खणीसमोर मागून आलेल्या ट्रकची त्याच्या दुचाकीला धडक बसली. बेशुद्धावस्थेत उपचारासाठी दाखल केले असता, उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याची नोंद जुना राजवाडा पोलिसांत करण्यात आली. आशुतोषचे वडील बांधकाम व्यावसायिक आहेत. त्याच्या मागे आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. अवजड वाहतुकीला बंदी असताना शालिनी पॅलेसच्या मागील बाजूने अंबाई टँक, क्रशर चौकाकडे जाणारा रस्ता सायलेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला होता. या मार्गावरून अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली होती. येथून वाहतूक रोखण्यासाठी उंचीची मर्यादा असणार्‍या कमानीही उभारण्यात आल्या होत्या; पण असे असतानाही या मार्गाने अवजड वाहतूक सुरूच आहे. या अपघाताने प्रशासनाचे हे दुर्लक्ष पुन्हा अधोरेखित झाले.

Back to top button