मंत्रिपद कोणाला? जिल्ह्यात चर्चा; कोरे, आवाडे, यड्रावकर की आबिटकर? | पुढारी

मंत्रिपद कोणाला? जिल्ह्यात चर्चा; कोरे, आवाडे, यड्रावकर की आबिटकर?

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आल्याने आता नवे सरकार सत्तेवर येईल. या सरकारमध्ये विनय कोरे, प्रकाश आवाडे आणि बंडखोर प्रकाश आबिटकर यापैकी कोणाला मंत्रिपद मिळणार याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.

अपक्ष म्हणून निवडून आलेले राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यांना पहिल्याच प्रयत्नात राज्यमंत्रिपद मिळाले. हे मंत्रिपद त्यांच्याकडे कायम राहणार का याची चर्चा आहे. विनय कोरे हे जनसुराज्य शक्‍ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. या पक्षाने पूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी सरकारला पाठिंबा दिला होता. या सरकारमध्ये विनय कोरे अपारंपरिक ऊर्जा मंत्री राहिले आहेत. त्यांच्या पक्षाचे पूर्वी चार आमदार निवडून आले आहेत. आता ते एकटेच विधानसभेत पक्षाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. निवडणुकीनंतर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला होता. देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी या भाजपातील वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत.
प्रकाश आवाडे हेही काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये सुरुवातीला राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री राहिले आहेत. भाजपचे सुरेश हाळवणकर यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर आवाडे यांनी काँग्रेस पक्ष सोडला व स्वतःचा ताराराणी पक्ष स्थापन केला.

2019 च्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. भाजप नेत्यांशी ते संपर्कात आहेत. शिवसेनेतून निवडून आलेले प्रकाश आबिटकर यांनी आता एकनाथ शिंदे गटाचे नेतृत्व स्वीकारले आहे. शिंदे यांच्या बरोबर जी पहिली टीम सुरतला गेली त्यामध्ये अबीटकर यांचा समावेश होता. त्यामुळे ते मंत्रिपदासाठी शिंदे गटाकडून प्रबळ दावेदार मानले जातात.

पालकमंत्री कोण?

यापूर्वी चंद्रकांत पाटील यांच्याकडे कोल्हापूरचे पालकमंत्रीपद होते. आता ते पुण्यातून निवडून आले आहेत. चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे पालकमंत्रीपद स्वीकारणार की पुण्याचे याचीही चर्चा आहे.

Back to top button