कोल्हापूर : ‘मन, हृदय व शरीर कसे निरोगी ठेवाल’ विषयावर उद्या व्याख्यान | पुढारी

कोल्हापूर : ‘मन, हृदय व शरीर कसे निरोगी ठेवाल’ विषयावर उद्या व्याख्यान

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : दै. ‘पुढारी’ व डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या संयुक्‍त विद्यमाने ‘मन, हृदय व शरीर कसे निरोगी ठेवाल’ या विषयावर शुक्रवारी (दि. 1) जगद्विख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मोहित गुप्‍ता (नवी दिल्‍ली) यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. मार्केट यार्ड येथील राजर्षी शाहू सांस्कृतिक भवन येथे सायंकाळी 5 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. ‘डॉक्टर्स डे’निमित्त दरवर्षी ‘पुढारी’ व्याख्यानमालेअंतर्गत गेली 19 वर्षे हा उपक्रम अविरतपणे सुरू आहे.

बदलती जीवनशैली, धावपळीचे व धकाधकीचे जीवन, ताणतणाव, असंतुलित आहार, वाहनांचा, मोबाईलचा तसेच ऑनलाईन प्रणालीचा अतिरिक्‍त वापर यामुळे मानसिक, शारीरिक, हृदयविकार, रक्‍तदाब, मधुमेह, निद्रानाश यांसारखे विविध व्याधी वाढत असून एकंदरीतच मनुष्याची अस्वस्थता वाढत चालली आहे. डॉ. गुप्‍ता हे शरीरासह मनासाठी आवश्यक असणारी आहारपद्धती, दैनंदिन जीवनात करावे लागणारे व्यायाम, आनंदी जीवनशैली तसेच सद्य:स्थितीतील विविध प्रकारच्या व्याधींवर कशी मात करता येईल, मनामध्ये भावनिक स्तरावर छोट-छोटे बदल करून आनंदी व समृद्ध जीवनाकडे जाण्याचा मार्ग व्याख्यानाच्या माध्यमातून दाखवणार आहेत.

या व्याख्यानात निरोगी आरोग्याचे गुपित आपल्या ओघवत्या शैलीतून डॉ. गुप्‍ता मार्गदर्शन उलगडणार आहेत. उपस्थित श्रोत्यांच्या शंकांचे ते निरसन करणार आहेत. प्रवेश अग्रक्रमानुसार देण्यात येणार असून या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समन्वयक डॉ. संदीप ज. पाटील यांनी केले आहे.

डॉ. मोहित दयाल गुप्‍ता यांचा परिचय

डॉ. मोहित गुप्‍ता सध्या जी. बी. पंत हॉस्पिटलमध्ये कार्डिओलॉजीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तसेच संसदेच्या आरोग्य संलग्‍नकातील हृदयरोगतज्ज्ञ आहेत. वैद्यकीय कारकिर्दीत 18 हून अधिक सुवर्ण पदके आणि 5 रौप्य पदके मिळविण्याची त्यांची कामगिरी आहे. कोव्हिड काळात हृदय, मानसिक आरोग्य आणि पोस्ट कोव्हिड हार्ट सिंड्रोमवर कोव्हिडच्या प्रभावाबाबत त्यांनी केलेल्या कार्याचे जागतिक स्तरावर कौतुक झाले आहे. सध्या उच्च रक्‍तदाब, तीव— कोरोनरी सिंड्रोमवरील व्यापक जनुकीय संशोधन करत आहेत. तसेच आरोग्य सेवा कर्मचार्‍यांमध्ये ताण मोजण्यासाठी मशिन लर्निंग व कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी राजयोग ध्यान तंत्र वापरत आहेत.

Back to top button