कोल्हापूर : कर्जाची परतफेड करणार्‍या जिल्ह्यातील 1 लाख 70 हजार शेतकर्‍यांना मिळणार लाभ | पुढारी

कोल्हापूर : कर्जाची परतफेड करणार्‍या जिल्ह्यातील 1 लाख 70 हजार शेतकर्‍यांना मिळणार लाभ

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : नियमित कर्जाची परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना राज्य शासनाने 50 हजार रुपये प्रोत्सहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी झालेल्या राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत ज्या शेतकर्‍यांनी मुदतीत बँकांची कर्ज परत केली आहेत, त्यांना या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील 1 लाख 70 हजार शेतकर्‍यांना लाभ होणार आहे.

राज्य शासनाने महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्‍ती योजनेतून थकीत कर्जदारांच्या कर्जाची माफी केली. त्याचवेळी नियमित कर्जाची परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांमधून तीव्र नाराजी व्यक्‍त केली होती. याबाबत शासनाने निर्णय घेऊन नियमित कर्जाची परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजारांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी 2027-18, 2018-19 आणि 2019-20 या तीन वर्षांत घेतलेल्या कर्जाची ज्या त्या वर्षी मुदतीत परतफेड केली आहे, अशा शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार होता.

या योजनेत पात्र ठरण्यासाठी 40 निकष पूर्ण करावे लागणार होते. त्यात पूरग्रस्त शेतकर्‍यांनी जर लाभ घेतला असेल तर त्यांना वगळण्यात येणार होते. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात मागील 2019-20 या हंगामात आलेल्या महापुरामुळे शेती पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले होते. त्यावेळी सरकारने पूरग्रस्त शेतकर्‍यांना मदत दिली होती.

त्यामुळे ज्या शेतकर्‍यांनी पूरग्रस्त शेतकरी म्हणून शासनाकडून मदत घेतली होती, त्या शेतकर्‍यांना प्रोत्साहन योजनेतून वगळण्यात आले होते. यामुळे शेतकर्‍यांमधून फार मोठी नाराजी होती. यावर मंगळवारच्या कॅबिनेट मंत्री मंडळाच्या बैठकीत चर्चा होऊन 2019-20 या सालातील प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना पात्र ठरविण्यात आले आहे.

Back to top button