कोेल्हापूर ही समाज परिवर्तनाची प्रयोगशाळा : डॉ. जनार्दन वाघमारे | पुढारी

कोेल्हापूर ही समाज परिवर्तनाची प्रयोगशाळा : डॉ. जनार्दन वाघमारे

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : राजर्षी शाहू महाराज यांनी त्या काळात आधुनिक युग आणत सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक क्रांती केली. जाती व्यवस्था मोडून काढण्याचे शाहू महाराजांचे स्वप्न होते. यासाठी संस्थानात विविध कायदे केले. त्यामुळेच कोल्हापूर ही समाज परिवर्तनाची प्रयोगशाळा होती, असे प्रतिपादन डॉ. स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुुलगुरू माजी खा. डॉ. जनार्दन वाघमारे यांनी केले.

राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे राजर्षी शाहू महाराज यांच्या 148 व्या जयंतीनिमित्त डॉ. तात्याराव लहाने यांना वर्ष 2020 आणि डॉ. जनार्दन वाघमारे यांना वर्ष 2022 चा राजर्षी शाहू महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. 1 लाख रुपये, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

डॉ. वाघमारे म्हणाले, राजर्षी शाहू महाराज यांचे नाव मराठवाड्यात 1970 पर्यंत माहीत नव्हते. लातूरला त्यावेळी राजर्षी शाहू महाराज महाविद्यालयाची स्थापना केली. या माध्यमातून शाहू महाराजांच्या कार्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले. शेतकरी, मजुरांच्या मुलांना घडवत लातूर पॅटर्न प्रयत्नपूर्वक निर्माण केला. राजर्षी शाहू महाविद्यालयाने दरवर्षी समाजाला 60 पेक्षा जास्त डॉक्टर, इंजिनिअर बनविले. लातूरचा नगराध्यक्ष, कुलगुरू व खासदार असताना शाहू महाराजांच्या प्रेरणेने काम केले. शाहू-फुले-आंबेडकर हे सर्वांसाठी आदर्श आहेत. त्यांना समाजात माणूस उभा करायचा होता. माणूस उभा करणे हे महाविद्यालये, विद्यापीठे, शिक्षण संस्थांचे काम आहे.

शाहू महाराजांनी शिक्षणाचा कायदा 1917 मध्ये केला. विविध जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे निर्माण केली. स्वतंत्र भारतात हा कायदा करण्यास 87 वर्षे लागली. भारतीय राज्यघटनेतील सर्व मूल्ये त्या काळात शाहू महाराजांनी अंमलात आणली. शिवशाहीला जेवढे महत्त्व आहे, तेवढेच शाहूशाहीला आहे. शाहू महाराजांनी प्रतिसृष्टी निर्माण केली होती. शाहू महाराज यांना सामाजिक, आर्थिक लोकशाही अभिप्रेत होती. सामाजिक न्यायासाठी त्यांनी आयुष्य, सत्ता वापरून परिवर्तन घडवून आले. आज राजकीय स्वातंत्र्यावर दडपण असून ते टिकेल किंवा नाही हे सांगता येत नाही.

सामाजिक समतेचे पुरस्कर्ते शाहू महाराज : डॉ. तात्याराव लहाने

ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने म्हणाले, सामाजिक समतेचे पुरस्कर्ते राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये, सामाजिक चळवळीमध्ये गरिबातील गरीब माणसाला कसे मोठे करता येईल, राजा म्हणून लोकांना लाभ कसा देता येईल, त्यांच्या अडचणी कशा सोडविता येईल, हे पाहिले. अशा या अष्टपैलू व्यक्‍तिमत्त्वाचा आज आपण 100 वर्षांनंतरही जेव्हा जेव्हा महाराजांचा विचार करतो, तेव्हा आपण राजर्षी शाहू महाराजांचे नाव कधीही विसरत नाही.

कोल्हापुरातील आठवणी सांगताना डॉ. लहाने म्हणाले, 2001 साली येथून जवळच असलेल्या कुशिरे गावात डोळ्यात औषध घालणारा माणूस आला होता. त्यामुळे येथे तीन वर्षे डोळ्याच्या शस्त्रक्रिया झाल्या नव्हत्या. तत्कालीन आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांनी कोल्हापुरात आणले. त्यानंतर लोकांना डोळ्याच्या औषधाबाबत माहिती दिली. त्यानंतर तीन वर्षे येथे राहून 600 पेक्षा अधिक डोळ्याच्या शस्त्रक्रिया करण्यात यशस्वी झालो. आजही 12 टक्के लोकांना मधुमेह होतो, गूळ किंवा साखर खाल्ल्याने मधुमेह होतो, गूळ खाल्ल्याने मधुमेह होत नाही, असा काही लोकांचा समज आहे. पण तसे नाही. गूळ आणि साखर खाल्ल्याने मधुमेह होतो. त्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण समतोल ठेवावयाचे असेल तर गोड खाणे टाळले पाहिजे.

मोबाईलच्या वापरामुळे डोळे खराब होतात, असे सांगून डॉ. लहाने म्हणाले, आपल्याकडे जे रुग्ण येतात, त्यातील 25 टक्के रुग्णांचे डोळे हे मोबाईलच्या अतिवापरामुळे खराब झाले आहेत. तेव्हा मोबाईलचा अतिवापर टाळा. ऑनलाईन शिक्षणाचा जमाना आला आहे. त्यामुळे मुलांना मोबाईल वापरावा लागतो. पण मोबाईल स्क्रीनवर न पाहता कानात एअर फोन घालून ऐकल्यास मोबाईलच्या स्क्रीनकडे लक्ष जात नाही, असेही त्यांनी सांगितले.

समाजाला दिशा देण्याचे राज्यकर्त्यांसमोर आव्हान : शाहू महाराज

शाहू महाराज म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांचे कार्य पुढे नेण्यासाठी हे पुरस्कार दिले जात आहेत. पण आजही समाजाला मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. आजच्या राजकीय परिस्थितीत समाजाला कशी दिशा देऊ शकतो, याचे आव्हान आज राज्यकर्त्यांसमोर आहे. समाज लोकशाहीच्या मार्गाने गेला पाहिजे, त्या दृष्टीने राजर्षी शाहू महाराजांनी कार्य केले, आजही त्या दृष्टीने समाजाला पुढे नेण्यासाठी सर्वांनी लक्ष देण्याची गरज आहे.

शाहू महाराजांच्या विचारांचा जागर पुढे नेऊया : पालकमंत्री

पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, दिग्गजांना राजर्षी शाहू पुरस्कार देण्याची परंपरा कोल्हापूकरांनी जपली आहे. लातूर व कोल्हापूरचे संबंध जिव्हाळ्याचे राहिले आहेत. कितीही पुस्तके लिहिली तरी कमी पडतील एवढे राजर्षी शाहू महाराज यांचे कर्तृत्व मोठे आहे. ते वेगळ्या स्वरूपात राजर्षी शाहू स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वाच्या माध्यमातून नव्याने लोकांच्या पुढे आणण्याचे काम करीत आहेत. 28 वर्षांच्या राजर्षी शाहू महाराज यांच्या कारकिर्दीत त्यांनी 280 वर्षाचे काम केले आहे. जपानच्या समुराई समूहाच्या सारखे काम त्या काळात शाहू महाराजांनी केेले.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी प्रास्ताविक केले. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले. सन्मानपत्राचे वाचन जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी केले. प्रशासनाधिकारी राजदीप सुर्वे यांनी आभार मानले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, ज्येष्ठ राजकीय विश्‍लेषक डॉ. अशोक चौसाळकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पाटील, सौ. सुलोचना लहाने आदी उपस्थित होते.

Back to top button