प्रवेशप्रक्रीया : केंद्रीय मंडळाच्या निकालानंतरच अकरावीची पुढील प्रवेश प्रक्रिया | पुढारी

प्रवेशप्रक्रीया : केंद्रीय मंडळाच्या निकालानंतरच अकरावीची पुढील प्रवेश प्रक्रिया

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
सीबीएसई, आयसीएसई या केंद्रीय शिक्षण मंडळाचे दहावीच्या परीक्षेचे निकाल जाहीर झाल्यानंतरच शहरस्तरीय अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर होऊन पुढील प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. आजअखेर 5 हजार 43 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रक्रियेअंतर्गत भाग-1 भरला आहे.

विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून 31 कनिष्ठ महाविद्यालयातील सुमारे 10 हजार 960 जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने शहरस्तरीय अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरूवात झाली आहे. प्रवेश प्रक्रियेअंतर्गत विज्ञान आणि वाणिज्य शाखा प्रवेश भाग-1 साठी 17 जूनपासून www.dydekop.org या संकेतस्थळावर नावनोंदणीस प्रारंभ झाला आहे. विज्ञान आणि वाणिज्य शाखेचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने भाग 1 व 2 भरुन दोन फेर्‍यात पूर्ण करण्यात येणार आहेत.

 कनिष्ठ महाविद्यालये सुरू होण्यास लागणार उशीर?

दहावीचा राज्य मंडळाचा निकाल जाहीर झाला असला तरी अन्य बोर्डाच्या परीक्षा निकाल जाहीर झालेले नाहीत. जुलै महिन्यात या दोन्ही बोर्डाचे निकाल लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशाचा भाग-1 भरता येणार आहे. अन्य बोर्डाचे निकाल लागल्यावर प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर होईल. त्यानंतर प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन कनिष्ठ महाविद्यालये सुरू होण्यास उशीर होण्याची शक्यता आहे.

 विद्यार्थ्यांची धावपळ

दहावी, बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पदवी प्रथम वर्ष, अकरावी, आयटीआय, पॉलिटेक्निकच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी लागणार्‍या कागदपत्रासाठी धावपळ सुरू झाली आहे. बहुसंख्य ठिकाणी ऑफलाईन पद‍्धतीने प्रक्रिया राबविण्यात येत आहे. रजिस्ट्रेशनला सुरूवात झाली आहे.

 पॉलिटेक्निक’साठी जिल्ह्यात 2200 विद्यार्थ्यांची नोंदणी

दहावीनंतरच्या प्रथम वर्ष पोस्ट एसएससी पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रम (पॉलिटेक्निक) प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रियेअंतर्गत आजअखेर जिल्ह्यातील सुमारे 2200 विद्यार्थांनी नाव नोंदणी केली आहे. जिल्ह्यात 20 पॉलिटेक्निक कॉलेज असून 6 हजार 600 प्रवेश जागा आहेत. 30 जूनपर्यंत नाव नोंदणीबरोरच प्रवेशासाठीच्या कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरल्याची निश्चितीची मुदत आहे. तात्पुरती गुणवत्ता यादी 3 जुलै रोजी प्रसिद्ध होईल. 4 ते 6 जुलै दरम्यान गुणवत्ता यादीवरील आक्षेप नोंदवण्याची मुदत आहे. 7 जुलैला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे.

 कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश क्षमता..

विज्ञान : 6000
वाणिज्य (इंग्रजी) : 1600
वाणिज्य (मराठी) : 3360

Back to top button