राजकीय खदखद: राज्यमंत्री म्हणून आणखी निधी मिळाला असता,पण माझ्यावर अन्याय; मंत्री यड्रावकर | पुढारी

राजकीय खदखद: राज्यमंत्री म्हणून आणखी निधी मिळाला असता,पण माझ्यावर अन्याय; मंत्री यड्रावकर

इचलकरंजी/जयसिंगपूर; पुढारी वृत्तसेवा: महाविकास आघाडीत खच्चीकरण होत असल्याचा सूर शिवसेनेच्या बंडखोर आमदारांकडून आळवला जात असतानाच आता आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनीही त्यात भर घातली आहे. राज्यमंत्री म्हणून मला आणखी निधी मिळाला असता; पण तसे झाले नाही, असे म्हणत त्यांनी निधी वाटपात मंत्र्यांनाही डावलले जात होते, अशी खदखद व्यक्‍त केली.

शिवबंधनात अडकलेले; परंतु सध्या गुवाहाटी येथील बंडखोर आमदारांच्या ताफ्यात सहभागी झालेले मंत्री यड्रावकर यांच्याशी दै.‘पुढारी’ने संवाद साधला असता त्यांनी मन मोकळे केले. कमी निधी मिळाला तरीही न डगमगता जो काही निधी मतदारसंघात खेचून आणता आला तितका निधी घेऊन जास्तीत जास्त विकासकामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. तरीही निधी वाटपात सर्वांना समान न्याय मिळाला असता तर शिरोळ मतदारसंघाचे नंदनवन करू शकलो असतो, अशी आघाडीच्या कारभारावर त्यांनी नाराजी व्यक्‍त केली.

मी शिवसेनेसोबत असलो तरी पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडून आलेलो आहे आणि मतदारसंघात अडीच वर्षांत आणखी विकास करायचा आहे. त्यामुळे प्रवाहासोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. म्हणूनच एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी गुवाहाटी येथे आलो आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतल्याचेही त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेत राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आरोग्य राज्यमंत्रिपद मिळाले. त्यामुळे ना. यड्रावकर यांचे एकनाथ शिंदे हे विश्‍वासू असल्याने एकनाथ शिंदे यांच्या विश्वासासाठी ना.यड्रावकर बंडात सहभागी झाले आहेत.

पहिल्यांदाच निवडून आलेल्या यड्रावकरांना 6 खात्यांचे राज्यमंत्री पद मिळाले. यड्रावकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहून शिरोळ विधानसभा मतदारसंघासाठी 350 कोटी रुपयांचा विकास निधी खेचून आणला. विविध कामांकरिता एकनाथ शिंदे यांची साथ होती. त्यामुळेच सध्या सुरू असलेल्या सत्तासंघर्षामध्ये एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय यड्रावकर यांनी घेतला आहे.

Back to top button