लॉकडाऊननंतर प्रथमच गोष्टींचा गण्या कोल्हापुरात

लॉकडाऊननंतर प्रथमच गोष्टींचा गण्या कोल्हापुरात
Published on
Updated on

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : नुकताच पाऊस सुरू झाल्यानंतर आता हास्यकारंजामध्ये कोल्हापूरचे प्रेक्षक चिंब भिजणार आहेत. अभूतपूर्व लोकप्रियता मिळवलेले हास्यसम्राट फेम अजितकुमार कोष्टी लॉकडाऊननंतर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांचा शनिवार, दि. 25 रोजी दुपारी साडेचार वाजता व्यावसायिक हसवणूक कार्यक्रम केशवराव भोसले नाट्यगृहात होणार आहे. एकापेक्षा एक सरस हास्यविनोदात अजितकुमार यांनी रंगवलेल्या गण्याच्या काल्पनिक पात्राला रसिकांनी डोक्यावर घेतले. गण्याच्या बालपणापासून ते त्याचे लग्न, संसार असे सगळ्या टप्प्यावरील किस्से प्रचंड लोकप्रिय झाले.

कार्यक्रमातून बदलत्या सामाजिक परिस्थितीवर मार्मिक भाष्य करत, डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम कोष्टी करणार आहेत. लॉकडाऊनमधील गण्याची ऑनलाईन शाळा, गण्याकडे फोन नाही तर मास्तरांकडे रेंज नाही इथपासून ते गण्याला पोरगी बघणे आणि हनिमूनपर्यंतचा प्रवास म्हणजे हास्याची मेजवानी असते.

गण्या या पात्राच्या माध्यमातून अजितकुमार कोष्टी यांनी माणसाचा कंजुषपणा, बायकोचा संशयी स्वभाव, नवर्‍याचा इरसालपणा, कोरोना काळातील गमतीजमती, ट्रकच्या मागील बाजूस लिहिलेली खुमासदार सुभाषिते, एस.टी. स्टँडवरील चमत्कारिक उद्घोषणा, प्रासंगिक विनोद, दैनंदिन जीवनात स्त्री आणि पुरुष यांनी एकमेकांच्या भूमिका केल्यास घडणारे संभाव्य विनोद, लहानग्यांच्या निरागस वागण्यातून घडणारे नकळत विनोदाचे साभिनय कथन करीत सुमारे दोन तास श्रोत्यांना ते हसवणार आहेत.

कोरोना काळात कळलेला माणूस, त्यांचे वागणे, समाजातल्या विविध क्षेत्रांतील लोकांचे अनुभव यातील बारकावे हास्याच्या माध्यमातून मांडत प्रेक्षकांना अंतर्मुख करण्यास भाग पाडले जाते.

विनोदाला विषय नसतो, प्रत्येक विषयात एक विनोद असतो, हे कोष्टींच्या कार्यक्रमाचे ब्रिद आहे. त्याची अनुभूती प्रेक्षकांना कार्यक्रम पाहिल्यानंतर हमखास येते. या कार्यक्रमात कस्तुरी क्लब सभासदांसाठी काही राखीव जागा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, ही मर्यादित तिकिटे टोमॅटो एफ.एम. ऑफिसमध्ये मिळणार आहेत. तिकिटाशिवाय कस्तुरी क्लब सभासदांना प्रवेश दिला जाणार नाही. राखीव जागा मर्यादित असल्याने प्रथम येणार्‍यास प्राधान्य देण्यात येईल. कस्तुरी क्लबच्या राखीव जागांसाठी 9096853977 या क्रमांकावर संपर्क साधावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news