कुरुंदवाड : अल्पवयीन मुले नशेच्या विळख्यात | पुढारी

कुरुंदवाड : अल्पवयीन मुले नशेच्या विळख्यात

कुरुंदवाड ; जमीर पठाण : कुरुंदवाड शहरातील अल्पवयीन मुले अमली पदार्थांच्या विळख्यात सापडली आहेत. शहरात गांजाची सर्रास विक्री केली जात आहे. गांजाची नशा करणार्‍यांमध्ये अल्पवयीन मुलांचे प्रमाण जास्त आहे.

कुरुंदवाड परिसरात कर्नाटक परिसरातून गांजाचा पुरवठा करणारी टोळी कार्यरत आहे. गांजाची तस्करी करण्यासाठी शाळकरी मुलांचा वापर केला जात आहे. दप्तरामधून हा पुरवठा केला जात असल्याची चर्चा आहे. गांजा प्रकरणी तीन महिन्यांपूर्वी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता टाकळीवाडी येथील सदाशिव कोळी या शेतकर्‍याने गांजाची शेती केल्याचे समोर आले.

तरुणांना गांजा ओढून दिवसभर झिंगण्याचे व्यसन लागले आहे. तसेच कुरुंदवाड व परिसरातील शाळकरी मुलेही गांजाच्या व्यसनात गुरफटली आहेत. त्यांना वेळीच व्यसनापासून रोखण्याची गरज आहे. सध्या गांजासाठी तरुण व युवकांकडून चोरी, मारामारी, याबरोबर सावकारी कर्जे घेऊन गांजाचे व्यसन केले जात आहे.

गांजा तस्करांचे कनेक्शन

शहरात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सात दुकाने फोडून रोख रक्कम व साहित्याची चोरी झाली आहे. या चोरीप्रकरणी अल्पवयीन मुलांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली असता गांजा विक्री करणार्‍या टोळीतील प्रमुखांची नावे पुढे आली आहेत.

Back to top button