कोल्हापूर : बिष्णोई आणि कॅनडास्थित गोल्डी ब्रार टोळीतील आंतरराष्ट्रीय गँगस्टरला बेड्या | पुढारी

कोल्हापूर : बिष्णोई आणि कॅनडास्थित गोल्डी ब्रार टोळीतील आंतरराष्ट्रीय गँगस्टरला बेड्या

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : लॉरिन्स बिष्णोई यांच्यासह कॅनडास्थित गोल्डी ब्रार टोळीशी लागेबांधे असलेल्या आणि पंजाब, हरियाणात प्रचंड दहशत निर्माण केलेल्या हरियाणातील कुख्यात गँगस्टरला कोल्हापूर पोलिसांनी मंगळवारी येथील रंकाळा टॉवर परिसरात सापळा रचून बेड्या ठोकल्या. मोहित ऊर्फ शेरा जगबीरसिंग मलिक (वय 30, रा. बिधल, ता. गोहाना, हरियाणा) असे त्याचे नाव आहे. खून, खुनाच्या प्रयत्नांसह संघटित गुन्हेगारी, खंडणी वसुलीसह तस्करीचे ढीगभर गुन्ह्याचे रेकॉर्ड असलेल्या गँगस्टर्सच्या अटकेसाठी इनाम जाहीर केले होते.

अत्यंत धोकादायक आणि गोळीबार करण्यात सराईत असलेल्या गँगस्टरला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकातील अधिकारी, कर्मचार्‍यांनी जीवाची पर्वा न करता त्याच्यावर झडप घालून त्याला घेरले. विविध राज्यांतील पोलिस यंत्रणांना चकवा देण्यासाठी मोहित ऊर्फ शेरा जगबीरसिंग मलिक आठवड्यापूर्वी कोल्हापुरात आश्रयाला आला होता. रंकाळा टॉवर परिसरात भाड्याने खोली घेऊन त्याने ठाण मांडले होते.

पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना आंतरराष्ट्रीय गँगस्टरच्या कोल्हापुरातील आश्रयाची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय गोर्ले, सहायक निरीक्षक किरण भोसलेसह पथकाने ऑपरेशन मोहीम फत्ते करून त्याच्या मुसक्या आवळल्या. गँगस्टरचे कोल्हापुरात कनेक्शन आहे का, याचीही वरिष्ठ स्तरावरून कसून चौकशी सुरू झाली आहे.

कोल्हापूर पोलिसांनी पंजाब, हरियाणासह दिल्ली येथील वरिष्ठ पोलिस यंत्रणांशी संपर्क साधला आहे. हरियाणा पोलिसांचे विशेष पथक बुधवारी दुपारपर्यंत कोल्हापुरात दाखल होत असल्याचे सांगण्यात आले. खुनासह गंभीर गुन्ह्यात 2011 व 2012 पासून पसार असलेल्या गँगस्टरला कोल्हापूर पोलिसांनी जेरबंद केल्याने हरियाणा पोलिस महासंचालक व विशेष पोलिस महानिरीक्षकांनी एलसीबी पथकाच्या कामगिरीचे कौतुक केले केले आहे.

वयाच्या सोळाव्या वर्षी गोळीबार करून खून, खुनाच्या प्रयत्नांसह गंभीर गुन्हे करून संशयित फरार होता.त्याच्या शोधासाठी पोलिसांनी जंग जंग पछाडले होते. पण विविध राज्यांत तो आश्रय घेत होता.

जीवाची पर्वा न करता पथकाने गँगस्टरला ठोकल्या बेड्या

पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी पथकातील अधिकारी, कर्मचार्‍यांचे अभिनंदन केले. पोलिस निरीक्षक संजय गोर्ले, किरण भोसले, महादेव कुराडे, उत्तम सडोलीकर, विलास किरोळकर, अनिल पास्ते, रणजित कांबळे, नामदेव यादव, सचिन पाटील, सायबरचे सचिन बेंडखळे कारवाईत सहभागी झाले होते.

अत्याधुनिक बनावटीच्या शस्त्रांसह…!

कोल्हापूर पोलिसांनी हरियाणा, पंजाब येथील वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांशी संपर्क साधून छायाचित्रासह वर्णन मागविले. त्यानंतर रंकाळा टॉवर परिसरात पथकाने सापळा रचला. घातकी व धोकादायक गँगस्टरकडे अत्याधुनिक बनावटीची शस्त्रे असल्याची खबर मिळाल्याने पथकाने अचानक झडप घालून त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्यासह खोलीचीही पोलिसांनी झडती घेतली. मात्र हत्यारे मिळून आली नाहीत.

कुख्यात गँगस्टरचा रंकाळा टॉवर परिसरात आश्रय

संशयित मलिक काही दिवसांपूर्वी कोल्हापुरात आश्रयाला आल्याची माहिती पोलिस अधीक्षक बलकवडे यांना वरिष्ठस्तरावरून मिळाली. कमालीची गोपनीयता बाळगून संशयिताचा शोध घेण्यात आला. चौकशीअंती कुख्यात गँगस्टर रंकाळा टॉवर परिसरात खोली भाड्याने राहात असल्याची माहिती पुढे आली. शिवाय रंकाळा टॉवर परिसरात व्यायामासाठी सकाळ-सायंकाळी फिरत असल्याचीही माहिती मिळाली.

Back to top button