

कोल्हापूर ; विकास कांबळे : जिल्हा परिषदेच्या उत्पन्नवाढीसाठी खासगीकरणातून मोक्याच्या ठिकाणी जि.प.च्या मालकीच्या जागा विकसित करण्यासाठी 143 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात नऊ गावांमधील जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. लवकरच यासाठी निविदा मागविण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषदेला स्वउत्पन्नाला खूप मर्यादा आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांना स्वउत्पन्नाचे मार्ग शोधण्याशिवाय पर्याय उरला नाही. यावर सभागृहात अनेकवेळा चर्चा झाल्या. मोकळ्या जागा विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला; परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होत नव्हती. भाऊसिंगजी रोडवरील जागेबाबत निर्णय घेण्यात आला. त्यासाठी महापालिकेची परवानगी घेण्यात आली. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना जिल्हा परिषदेचे हित पाहण्याऐवजी काही पदाधिकार्यांनी जाता जाता स्वत:चे भले करून घेतले. सोबतच एक ते दीड कोटी निधी काही जणांनी लाटला.
मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी जिल्हा परिषदेच्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न सुरू केले. त्यातून मोक्याच्या ठिकाणच्या जागा विकसित करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी माहिती संकलित करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्या. कार्यकारी अभियंता महेंद्र क्षीरसागर यांनीही तालुक्यांकडून माहिती मागवून घेतली.
पहिल्या टप्प्यात नऊ गावांतील जागा निश्चित करण्यात आल्या. त्यामध्ये कागल येथील जागा, चंदगड स्टँडजवळील बांधकाम विभागाची जागा, चंदगड पंचायत समिती परिसर, वडगाव पशुवैद्यकीय दवाखाना, आजरा कुमार भवन शाळा परिसर, शिरोळ पंचायत समिती परिसर, सरवडे पशुवैद्यकीय दवाखाना, शाहूवाडी स्टँडजवळील विश्रामगृह व इचलकरंजीतील हवामहल बंगल्यानजीकची जागा यांचा समावेश आहे.
सर्वात मोठा प्रकल्प शिरोळला
सर्वात मोठा 41 कोटींचा प्रकल्प शिरोळ पंचायत समिती परिसर, 40 कोटींचा इचलकरंजीतील हवामहल बंगल्याजवळील व 23 कोटींचा प्रकल्प शाहूवाडीत उभारण्यात येणार आहे. उर्वरित ठिकाणी अडीच ते तीन कोटींचे प्रकल्प आहेत.