कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील कामे वेगाने सुरू असून जिल्ह्याचा 921 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यात 1 हजार 534 योजनांचा समावेश आहे. त्याला मंजुरी देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
जलजीवन मिशन अंतर्गत सन 2024 पर्यंत प्रती व्यक्ती रोज 55 लिटर या प्रमाणे प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे शुद्ध व सुरक्षित पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या द़ृष्टीने जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग काम करत आहे. आराखड्यानुसार 1305 योजनांची अंदाजपत्रके तयार केली असून 939 योजनांना प्रशासकीय मान्यता दिली आहे.
तसेच 609 योजनांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. उर्वरित योजनांच्या निविदा प्रसिद्ध करण्याची कार्यवाही सुरू आहे. आराखड्यात मंजूर कामांची अंदाजपत्रके व निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करून सर्व कामे तत्काळ सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सद्यस्थितीस जिल्ह्यातील 6 लाख 88 हजार 434 कुटुंबांपैकी आजअखेर 5 लाख 31 हजार 68 इतक्या कुटुंबांमध्ये नळ जोडण्यात आले आहेत. ग्रामपंचायतींनीही नळजोडणीचे काम सुरू केले आहे. शाळा व अंगणवाड्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. स्व. मीनाताई ठाकरे पाणी साठवण योजना 89 टंचाईग्रस्त वाड्या-वस्त्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.
या योजनेंतर्गत सर्व कामे दर्जेदार व गतीने पूर्ण करण्याचा प्रशासनाने प्रयत्न करावा. त्यासाठी ग्रामस्थांनीही सक्रिय सहभाग द्यावा, असे आवाहनही पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले आहे.
जलजीवन मिशन द़ृष्टिक्षेपात
* 1 हजार 534 कामांना मंजुरी
* 921 कोटींचा आराखडा तयार
* 939 योजनांना प्रशासकीय मान्यता
* स्व. मीनाताई ठाकरे पाणी साठवण योजना 89 टंचाईग्रस्?त वाड्या-वस्त्यांमध्ये राबविणार
* 40 ठिकाणी सोलर पंप
* योजनेत सौरऊर्जेचा वापर