आषाढी वारीसाठी जिल्ह्यातून 300 एसटी बसेसचे नियोजन | पुढारी

आषाढी वारीसाठी जिल्ह्यातून 300 एसटी बसेसचे नियोजन

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा कोरोनानंतर दोन वर्षांनी भरणार्‍या आषाढी वारीसाठी महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या वतीने राज्यातून ४ हजार ४७०० बसेस सोडण्याचे नियोजन केले आहे. कोल्हापूर विभागातून ३०० बसेस सोडण्यात येणार आहेत. राज्य नियोजनाप्रमाणे ६ ते १४ जुलै या कालावधीत या बसेस सोडण्यात येणार आहेत. त्यासाठी आगाराच्या पातळीवर नियोजनाची तयारी सुरू आहे.

दोन वर्षे कोरोनामुळे पंढरपूरची आषाढी वारी साधेपणाने साजरी करावी लागली. सध्या कोरोनाची तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल केल्याने पंढरपूरला वारीसाठी जाणार्‍या वारकर्‍यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन एसटी महामंडळाच्या वतीने यावेळी जय्यत तयारी केली आहे.

कोल्हापूर विभागातून यापूर्वी आषाढी वारीसाठी २५० ते २७५ बसेस सोडल्या जात होत्या; पण यावर्षी वारकर्‍यांची संख्या आणि सध्या प्रवाशांकडून होत असलेली माहिती लक्षात घेता आणखी २५ ते ३० जादा बसेस सोडण्याचे नियोजन विभागाने केले आहे. पंढरपूरला आलेल्या बसेसची एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी शहरात पाच ठिकाणी बसस्थानके उभी करण्यात आली आहेत. कोल्हापूरहून जाणार्‍या भाविकांसाठी पांडुरंग बसस्थानकाचा वापर करता येणार आहे.

यात्रा कालावधीसाठी संगणकीय आरक्षण सुविधा, चौकशी कक्ष, मार्गदर्शक फलक जिल्ह्यातील प्रत्येक आगाराच्या ठिकाणी लावण्यात येतील. जिल्ह्यातील ज्या भागातून बसेसाठी भाविकांची मागणी होईल, तेथे बसेस देण्याचेही नियोजन आहे.
– शिवराज जाधव,
विभागीय वाहतूक अधिकारी

Back to top button