कोल्हापूर : नालेसफाई केली म्हणता… मग, नागरिकांच्या तक्रारी का? | पुढारी

कोल्हापूर : नालेसफाई केली म्हणता... मग, नागरिकांच्या तक्रारी का?

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : शहरातील नालेसफाईचा पालकमंत्री सतेज पाटील यांनी आढावा घेतला. महापालिका प्रशासनाच्या वतीने आजअखेर केलेल्या नाले सफाईच्या कामाची माहिती दिली. त्यावेळी पाटील यांनी आरोग्य विभागाने नालेसफाई करूनही नागरिकांच्या तक्रारी का येत आहेत, असा प्रश्न उपस्थित केला. उर्वरित नालेसफाई लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पावसाळ्यापूर्वी आरोग्य विभाग साधन सामग्रीसह सक्षम करावा, मशिनरी तातडीने खरेदी करावीत, असे आदेशही मंत्री पाटील यांनी प्रशासनाला दिले.

ताराबाई पार्क येथील निवडणूक कार्यालयात पालकमंत्री पाटील यांनी आरोग्य विभागाचा आढावा घेतला. यावेळी आ. ऋतुराज पाटील, प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, उपायुक्त रविकांत आडसूळ उपस्थित होते. पालकमंत्री पाटील यांनी 6 प्रभागांसाठी 1 ट्रॅक्टर याप्रमाणे 16 ट्रॅक्टर कचरा व पालापाचोळा गोळा करण्यासाठी खरेदी करावेत, मुख्य चौकात व गर्दीच्या ठिकाणी कंटेनर खराब झाल्यास त्याठिकाणी दुसरा कंटेनर ठेवा, खराब झालेल्या कंटेनरच्या ठिकाणी टॅक्टर- ट्रॉली लावावी. या ट्रॉलीमधून दोन शिफ्टमध्ये कचरा उठाव करावा.

अंबाबाई मंदिर परिसरात कचरा उठावसाठी दोन शिफ्टमध्ये कर्मचार्‍यांचे फिरते पथक नेमा, घाटी दरवाजा जवळ फूल विक्रेत्यांचे वेस्टेज टाकण्यासाठी तेथेही एक ट्रॉली लावावी, प्रत्येक प्रभागामध्ये किती कर्मचारी काम करतात याबाबतचे अ‍ॅप तयार करावे. प्रभागातील नागरीकांना आपल्या भागात किती लोक काम करतात, हे कळले पाहिजे याबाबतचे नियोजन करा, असे आदेशही पालकमंत्री पाटील यांनी प्रशासनाला दिले. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, कार्यकारी अभियंता हर्षजीत घाटगे, उपशहर अभियंता नारायण भोसले, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील, वर्कशॉप प्रमुख चेतन शिंदे उपस्थित होते.

Back to top button