कोल्हापूर : वादाचा पडदा पुन्हा उघडणार? | पुढारी

कोल्हापूर : वादाचा पडदा पुन्हा उघडणार?

कोल्हापूर ; सचिन टिपकुर्ले : वर्चस्ववाद तसेच आगामी निवडणुकीत पॅनेलची मोट बांधण्यासाठी चित्रपट महामंडळाचा वादाचा पडदा पुन्हा उघडणार आहे. कोल्हापुरात होणार्‍या कार्यकारिणी बैठकीच्या निमित्ताने संचालक मंडळातील वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यात वर्तवण्यात येत आहे.

विद्यमान कार्यकारिणीची पाच वर्षांची मुदत एप्रिल 2021 मध्ये पूर्ण झाली. गतवेळच्या निवडणुकीत 25 एप्रिल 2016 रोजी मतदान होऊन 26 एप्रिलला निकाल जाहीर झाला होता. कोरोनामुळे सध्या अनेक संस्था, संघटनांच्या निवडणुका पुढे गेल्या आहेत. याचा परिणाम चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीवरही झाला; पण गेल्या दोन वर्षांच्या काळात महामंडळाच्या अंतर्गत राजकारणाला चांगलीच उकळी फुटली.

कोल्हापुरातील कार्यकारिणीतील अन्य संचालकांनी किमान ऑनलाईन बैठक घ्या, या मागणीसाठी आंदोलन केले; पण अध्यक्ष मेघराज भोसले यांनी बैठक लावली नाही. यामुळे अध्यक्षविरुद्ध कोल्हापुरातील काही संचालकांचा गट एकत्र आला. जयप्रभा स्टुडिओ आंदोलनाच्या माध्यमातून त्याला पुन्हा एकदा बळ मिळाले.

नुकतेच महामंडळाची कार्यकारिणी बैठक कोल्हापुरात होणार असल्याचे पत्र संचालकांना देण्यात आले आहे; पण या बैठकीची कोणतीच माहिती नसल्याचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी सांगितले. न्यायप्रविष्ट विषयावर चर्चा कार्यकारिणी बैठकीत करणे योग्य नसल्याचे मतही भोसले यांनी मांडले आहे. प्रमुख कार्यवाह सुशांत शेलार यांनी अध्यक्षांबरोबर चर्चा करूनच ही बैठक घेतल्याचे महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी सांगितले.

बैठकीकडे लक्ष

कार्यकारिणी सभा घ्या, यानंतर महामंडळाची सर्वसाधारण सभा घ्या, यासाठी चित्रपट मुख्य कार्यालयाला टाळे लावले. तर यापूर्वी कोल्हापुरात झालेल्या कार्यकारिणी बैठकीत मेघराज भोसले यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणून सुशांत शेलार यांची निवड करण्यात आली होती. त्यामुळे आता 22 रोजी होणार्‍या कार्यकारिणी बैठकीत नमके काय होणार, याकडे सभासदांचे लक्ष लागून आहे.

Back to top button