‘अंबाबाई’चा लाडू प्रसाद टेंडरच्या लालफितीत | पुढारी

‘अंबाबाई’चा लाडू प्रसाद टेंडरच्या लालफितीत

कोल्हापूर पूनम देशमुख : सुट्टीच्या एप्रिल ते आजअखेर या काळात सुमारे 30 लाख भाविक श्री अंबाबाईच्या प्रसादाविना परतले. चूक कोणाची आणि बरोबर कोण, यापेक्षा भाविकांना रिकाम्या हाती परतावे लागले, ही खेदाची बाब आहे. अशी वेळ पुन्हा येऊ नये यासाठी केवळ यंत्रणेने दक्षता घेण्याची गरज नाही, तर या यंत्रणेवर वचक ठेवणार्‍या नेत्यांनीही याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

भाविकांसाठी बुंदीच्या लाडूची प्रसाद म्हणून विक्री केली जाते. हे लाडू देवस्थान समितीकडून विकले जातात. मध्यतंरी लाडू कोणी तयार करायचे, यावरून बराच गदारोळ झाला. अखेर कळंबा कारागृहातील महिला कैद्यांकडून हे लाडू तयार करून घेण्याचे ठरले आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली.

देवस्थान समितीच्या मागणीनुसार कारागृह प्रशासनाकडून लाडू तयार करून पॅकिंगसह त्याचा पुरवठा केला जायचा. दिवसाला दोन ते अडीच हजार लाडूंची देवस्थान समितीमार्फत विक्री होत असून, सुट्टीच्या दिवशी आणि शनिवार, रविवारी लाडू विक्री दुपटीने वाढते. देशाच्या कानाकोपर्‍यांतून येणार्‍या भाविकांच्या घरी अंबाबाईचा प्रसाद भक्तिभावाने नेला जातो. मात्र, लॉकडाऊननंतर मंदिर उघडल्यापासूनच लाडू विक्रीची ही साखळी विस्कळीत झाली आहे.

लॉकडाऊनच्या दरम्यान मंदिर बंद असल्याने देवीच्या प्रसादाचा लाडू पुरवठाही पर्यायाने बंद झाला. भाविकांना प्रसाद लवकर मिळावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. याकामी कच्च्या मालासाठी दोनदा टेंडर काढण्यात आले असून, आलेल्या वस्तू वापरण्यायोग्य असल्याचा वैद्यकीय अहवाल आल्यानंतर लाडू तयार करण्यात येणार आहे. ही तयारी अंतिम टप्प्यात असून, आठवडाअखेर प्रसाद उपलब्ध होईल.
– चंद्रशेखर इंदूलकर
अधीक्षक, कळंबा कारागृह

लॉकडाऊननंतर मंदिर उघडताच कारागृह प्रशासनाला लाडू प्रसाद पुरवठा करण्यासंबंधीचे पत्र पाठवले. साधारण एप्रिलअखेर हे पत्र कळंबा कारागृह प्रशासनाला मिळाले. त्यानुसार त्यांच्याकडून टेंडर काढून इतर प्रक्रियेसाठी विलंब होत आहे. याबाबत आम्ही कारागृह प्रशासनाशी संपर्क साधून लाडू प्रसाद पुरवठ्याची प्रक्रिया लवकर सुरू करण्याबाबत सांगितले आहे.
– शिवराज नाईकवाडे, सचिव, देवस्थान समिती

Back to top button