इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा; आमचं ठरलंय म्हणायचं आणि सगळं घ्यायचं, एवढंच सुरू आहे. मात्र, भारतीय जनता पक्ष, महाडिक, आवाडे, कोरे अशी मोठी ताकद जिल्ह्यात एकत्रित आल्यामुळे भविष्यात हे चित्र बदलल्याचे पाहावयास मिळेल, असे प्रतिपादन नूतन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. येथून पुढे 'भाजपच भाजप' असे म्हणत आमदार प्रकाश आवाडे यांनीही पुढील निवडणुका ताकदीने लढण्याची घोषणा केली.
कर्नाटकी बेंदरानिमित्त परंपरेनुसार मानाचा कर तोडण्याचा कार्यक्रम पार पडला. इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित जनावरांचे प्रदर्शन, लाकूड ओढण्याच्या स्पर्धा आदी विविध स्पर्धांमधील विजेत्यांना माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, खा. महाडिक, आ. आवाडे, स्वप्निल आवाडे, राहुल आवाडे, बाळासाहेब कलागते, बाबासो पाटील आदींच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात आले. तत्पूर्वी महाडिक यांचा नागरी सत्कारही करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
महाडिक म्हणाले, महाविकास आघाडीने सर्व ताकद पणाला लावलेली असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या रणनीतीमुळे खासदारपद मिळाले. आपल्या विजयात आमदार आवाडे, विनय कोरे यांचाही सिंहाचा वाटा आहे. जिल्ह्यात एकाधिकारशाही निर्माण झाली आहे. कामाशी देणे-घेणे नाही; मात्र त्यांचे बाकीचे कार्यक्रम सुरू आहेत. आगामी निवडणुकांमध्ये हे चित्र बदललेले दिसून येईल. आमदार आवाडे यांनीही ही तर सुरुवात असून भविष्यात महापालिका, जिल्हा परिषद व अन्य निवडणुका भाजपच्या माध्यमातून लढवून त्या जिंकणार, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी नागरिकांनी गर्दी केली होती.