इचलकरंजी : पुढारी वृत्तसेवा
आमच्या समाजातील सर्वजण एकोप्याने राहात आहेत. गावामध्ये धनगर समाज बांधवांची संख्या मोठी आहे. अनेक उत्सव व सण आम्ही गुण्यागोविंदाने साजरे करतो. त्याचबरोबर समाजातील कोणत्याही कुटुंबाला आम्ही वाळीत टाकले नाही, असे स्पष्टीकरण चंदूर येथील धनगर समाजाच्या वतीने प्रमुखांनी दिले
आहे.
चंदूर गावामध्ये धनगर समाजाची लोकसंख्या मोठी आहे. ग्रामदैवताची पूजाअर्चा समाजाच्या वतीने करण्यात येते. यामध्ये सर्व लोकांना सामील करून घेतले जात आहे. त्याचबरोबर वर्षभर धार्मिक कार्यक्रम सुरू असतात. त्यामध्ये गावातील सर्व जाती-धर्मांतील लोकांबरोबरच धनगर समाजातील सर्वजण हजेरी लावतात. त्यांच्यामध्ये दुजाभाव केला जात नाही. त्यामुळे समाजामध्ये बहिष्कार घालणे किंवा वाळीत टाकणे असा प्रकार घडला नाही, असे निवेदनात स्पष्ट केले आहे.
याबाबत 2018 साली शिवाजीनगर पोलिस ठाण्यामध्ये समाजातील प्रमुखांची बैठक झाली होती. त्यावेळी तत्कालीन पोलिस अधिकार्यांसमोर सर्वजण एकत्र राहण्याचे निश्चित झाले होते. त्यानंतर आतापर्यंत सर्व समाज एकत्र आहे. तसेच समाजाच्या वतीने कोणत्याही व्यक्तीला दंड करण्यात आला नाही; परंतु समाजाच्या वतीने जे धार्मिक कार्यक्रम असतात, त्यासाठी लागणारी वर्गणी किंवा ज्याचा जो मान असतो, त्या मानानुसार होणारा खर्च धार्मिक कार्यासाठी वापरला जातो. तसेच देवाची पूजा करणार्या पुजार्याला सर्व समाजाच्या वतीने वार्षिक मेहनताना देण्यात येतो. तरीही समाजाचे सर्व कार्यक्रम व धार्मिक विधी पूर्ववत करण्यासाठी बहुसंख्य समाज काम करीत आहे. त्यामुळे समाजाची नाहक बदनामी करण्याचा प्रकार काही जणांकडून मुद्दाम केला जात आहे. तो त्यांनी थांबवावा, असेही धनगर समाज बांधवांनी निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर मारुती पुजारी, भगवान पुजारी, संजय गावडे, सुधीर पुजारी, महादेव पुजारी आदींसह बहुतांश धनगर समाजबांधवांच्या सह्या आहेत.