

कोल्हापूर; सागर यादव : दारूच्या बाटल्यांच्या धोकादायक काचा, स्वच्छता व डागडुजीअभावी वाढलेल्या काटेरी वनस्पती, सुरक्षा यंत्रणा नसल्याने जागोजागी साठलेले कचर्याचे ढीग आणि देखभालीअभावी हिरवळीच्या ठिकाणी झालेले माती-दगडगोट्यांचे खडबडीत पॅच अशी अत्यंत दयनीय अवस्था कोल्हापुरातील मैदानांची झाली आहे. खेळ आणि खेळाडू वाढले पण त्यांची कर्मभूमी असणार्या मैदानांची अवस्था 'जैसे थे' असल्याचे वास्तव आहे.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पाठबळामुळे कोल्हापुरात क्रीडा क्षेत्राचा भक्कम पाया रोवला गेला; मात्र आजच्या घडीला या परंपरेच्या संरक्षणाबाबत प्रचंड उदासीनता असल्याचे वास्तव आहे. खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा सोडाच पण त्यांना घडविणार्या मैदानांच्या विकासाचा पत्ता नाही. महापालिका व जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे मैदाने केवळ नावालाच असल्याचे दिसते.
सुरक्षा यंत्रणा नसल्याने बहुतांश मैदानांना ओपन बारचे स्वरूप प्राप्त झाले आहे. भटक्या जनावरांच्या त्रासाबरोबरच वाहन शिकण्याची जागा, पार्किंग व विविध व्यावसायिक कारणांसाठीही मैदानांचा वापर केला जात आहे. यासाठी उभारण्यात येणार्या मंडपांमुळे मैदानांचे सातत्याने नुकसान होत आहे.
शहरातील बहुतांश मैदानांच्या विकासासाठी निधी उपलब्ध नसल्याने वास्तव आहे. काही मैदानांवर लाखो रुपयांचा निधी खर्चूनही त्यांची अवस्था दयनीयच आहे. अनेक मैदानांचा वापर अडगळीचे साहित्य ठेवण्यासाठी केला जात आहे. लोकप्रतिनिधींकडून नव्या मैदानांची घोषणा केली जात आहे; मात्र जुन्या मैदानांसाठी निधीची तरतूद होत नाही.