कोल्हापूर : एकनाथ नाईक : "हिंदुस्थान नव्हे, आशिया व सबंध जग यांच्या दृष्टीने हा महत्त्वाचा क्षण आहे… पूर्वेकडे स्वातंत्र्याच्या या नवतार्याचा उदय होत असून त्याच्याबरोबर नवआशा निर्माण होऊन एक स्वप्न सत्यसृष्टीत उतरत आहे…!" देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे हे शब्द… दीडशे वर्षांचा पारतंत्र्याचा अंधार हटून स्वातंत्र्याची नवी पहाट फुलवताना त्यांनी देशाला दिलेल्या संदेशातील या ओळी… त्याचीच रंगीत हेडलाईन करून 75वर्षांपूर्वी दैनिक 'पुढारी' ने 15 ऑगस्ट 1947 या दिवशीचा अंक प्रसिद्ध केला होता.
क्षितिजावर नवरंगांची उधळण करीत आलेल्या स्वातंत्र्यसूर्याच्या स्वागताला 75 वर्षांपूर्वी पुढारी'ने रंगीत अंक छापला होता.
कोल्हापूर शहरात स्वातंत्र्य महोत्सव साजरा करण्यात आला होता. नगरपालिकेच्या व इलाखा पंचायतीच्या इमारतीवर व जुन्या राजवाड्यावर दीपोत्सवाचा झगमगाट करण्यात आला होता. शहरातील अनेक ठिकाणी विद्युत रोषणाई केली होती. प्रमुख रस्त्यांवर कमानी उभ्या केल्या होत्या. हार, मेवामिठाई खरेदीसाठी दुकानांत रीघ लागली होती.
शहरातील घरांवर भगवे व नवराष्ट्रध्वज डौलाने फडकत होते. दसरा, दिवाळीला या आनंदोत्सवाने मागे सारले आहे, अशा चैतन्यमय वातावरणात लोकांमध्ये रोमांच संचारले होते. महाराष्ट्र मंडळातर्फे जुना राजवाड्यातून दसरा चौकापर्यंत भगव्या झेंड्याची मिरवणूक काढली होती. येथे 'भगव्या ध्वजाची महती' विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. सायंकाळी खासबाग मैदानात कुस्त्या व शक्तीचे प्रयोग झाले.
15 ऑगस्ट रोजी करवीर इलाखा पंचायत रद्द करून तालुका व जहागिरी पंचायती स्थापन करण्याचा निर्णय झाला. इलाखा पंचायत, देवस्थान मंडळ व शिक्षण मंडळ या संस्था रद्द करण्यात आल्या. नव्या पंचायती स्थापन होईपर्यंत स्थानिक स्वराज्य खाते पाहणार्या मंत्र्यांच्या देखरेखीखाली इलाखा पंचायतीचे कामकाज चीफ ऑफिसरमार्फत चालविले होते. असे सविस्तर वार्तांकन 15 ऑगस्टच्या 'पुढारी' मध्ये रंगीबेरंगी नवलाईन छापले होते.
स्वातंत्र्य दिनानिमित्त कोल्हापुर मध्ये हातमाग विणकर संघ, देवांग समाज मंगळवार पेठेतर्फे मेवामिठाई, शिपुगडे तालीम सार्वजनिक संस्थेतर्फे ध्वजारोहण व अन्य कार्यक्रम, वरुणतीर्थ वेशीतील आर्ट स्कूलमध्ये ध्वजारोहण, शुगर मिलचा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम फॅक्टरीच्या असेंब्ली हॉलमध्ये झाला. सर्व कर्मचार्यांना दोन दिवसांची सुट्टी देण्यात आली होती.
गजानन विद्यालयात देखील विविध कार्यक्रम आयोजित केले होते. मिरज नगरपालिकेने आपल्या सर्व कर्मचार्यांना 10 रुपये बक्षीस दिले होते. जयसिंगपूर येथील मर्चंट असोसिएशनने पंधरा रुपये बोनस गुमास्ता मंडळास दिला होता. हातकणंगले तालुक्यातील चंदूर येथे 'देव माणूस' नाटकाचा प्रयोग झाला; तर निपाणी येथील श्रीराम को-ऑप. बँकेने आनंदोत्सव साजरा करण्यासाठी 25 रुपये मंजूर केले होते. यांसह सार्वजनिक ठिकाणी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता.
स्वातंत्र्यदिनी 75 वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाने 'तुमची प्राचीन संस्कृती व तुमची वृत्ती हिंदुस्थानच्या भावी स्वास्थ्याची व माहात्म्याची ग्वाही देईल'; तर स्वातंत्र्याची प्रभात हिंदी नागरिक उत्साहपूर्ण पद्धतीने साजरी करत असताना आपले व हिंदी नागरिकांचे अभिनंदन करून हिंदुस्थानचा भविष्यकाल उज्ज्वल व यशदायी होवो, अशा चीनने शुभेच्छा दिल्या होत्या.
कॅनडाचे हाय कमिशनर यांनी 'पुरातन व महत्त्वपूर्ण हिंदुस्थान आज सार्वभौम होत आहे. त्याच्या मागे शतकांचा अनुभव व बुद्धिवैभव आहे. तरुणांचा आत्मविश्वास, उत्साह व ध्येयशीलता लाभली आहे. हे गुणविशेष हिंदुस्थानला बळकटी देतील. जगात त्यांचे न्याय व देशाला महत्त्वपूर्ण स्थान मिळो', असे प्रशंसोद्गार काढत कॅनडाचे हाय कमिशनर जॉन किअर्ने यांनी शुभेच्छा दिल्या होत्या.