Rape Case : गोव्यात मड बाथ देण्याच्या बहाण्याने ब्रिटीश महिलेवर बलात्कार | पुढारी

Rape Case : गोव्यात मड बाथ देण्याच्या बहाण्याने ब्रिटीश महिलेवर बलात्कार

पणजी; पुढारी ऑनलाईन : मड बाथ देण्याच्या बहाण्याने एका ब्रिटीश महिलेवर (Rape Case) बलात्कार करण्यात आला. ही घटना उत्तर गोव्यातील (North Goa) हरमल (Arambol beach)समुद्र किनाऱ्यावर घडली. या प्रकरणी पोलिसांनी विन्सेंट डिसोझा (वय २२) या संशयिताला मंगळवारी (दि.७) अटक करत त्याच्यावर गुन्हा नोंद केला. सोमवारी (दि. ६) सायंकाळी पेडणे पोलिस स्थानकात पीडित ब्रिटीश महिलेद्वारे फिर्याद नोंदविण्यात आली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ब्रिटीश महिला हरमल समुद्र किनारी विश्रांती घेत होती. यावेळी तेथे असणारा विन्सेंट डिसोझा याने त्या महिलेस जवळच असलेल्या गोड्या पाण्याच्या तलावाजवळ मड बाथ देण्याची फूस लावली. डिसोझाच्या भूलथापांना यावेळी ती महिला बळी पडली. विन्सेंट डिसोझा हा काही व्यावसायिक मालिश करणारा नव्हता. पण त्याच्या बोलण्याला सदर महिला बळी पडली. ती एकटी असल्याचा फायदा घेत डिसोझा याने मड बाथच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार (Rape Case) केला.

या घटनेनंतर पीडित महिलेने मदतीसाठी युकेच्या दुतावासाशी संपर्क साधला. दुतावसाच्या सहकार्याने त्या महिलेने पेडणे पोलिस स्थानकात फिर्याद नोंदवली. ही ब्रिटीश महिला पर्यटन व्हिसाद्वारे गोव्यामध्ये फिरण्यास आली आहे. या घटनेतील स्थानिक रहिवासी असलेला संशयित विन्सेंट डिसोझा हरमल समुद्रकिनाऱ्याजवळ बेकायदेशीरपणे मसाज करण्याचे काम करतो. त्याने याआधी एका शाळेत ग्रंथपाल म्हणूनही काम केले होते, असे पोलिसांनी सांगितले.

ही घटना २ जून रोजी घडली होती. पण महिलेने ब्रिटनमधील तिच्या कुटुंबियांशी सल्लामसलत केल्यानंतर आणि भारतातील ब्रिटीश दूतावासाकडून मदत मागितल्यानंतर सोमवारी पेडणे पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर निरीक्षक विक्रम नाईक यांच्या नेतृत्वाखाली पेडणे पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली. संशयिताला म्हापसा (Mapusa) येथील जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. संशयिताविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३७६ (बलात्कार) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर करत आहेत.

या आठवड्याच्या सुरुवातीपासून गोवा पोलिसांनी राज्यात कार्यरत बेकायदेशीर मसाज पार्लर, फेरीवाले आणि दलाल यांच्यावर कारवाई सुरू केली. या प्रकरणी गोव्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री प्रमोद सावंत यांनी बेकायदेशीर मसाज पार्लरवर कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. तसेच लायसन्स असणाऱ्याच ब्युटी पार्लर आणि स्पा चालविण्याची परवानगी देण्यात आली आहे. शिवाय गोव्यामध्ये पुरुषाकडून पुरुषाला आणि महिलेकडून महिलेलाच मसाज करण्याची परवानगी आहे.

Back to top button