कोल्हापूर-पुणे मार्गावर विद्युत इंजिनसह धावली कोयना एक्स्प्रेस | पुढारी

कोल्हापूर-पुणे मार्गावर विद्युत इंजिनसह धावली कोयना एक्स्प्रेस

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
कोल्हापूर-पुणे या विद्युतीकरण पूर्ण झालेल्या मार्गावर कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेस पहिली रेल्वे धावली. कोल्हापूर रेल्वे स्थानकात यानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हापूरच्या रेल्वेच्या इतिहासात यानिमित्ताने आणखी एक पान जोडले गेले, अशा शब्दात मान्यवरांनी भावना व्यक्त केल्या.

रविवारी कोल्हापुरात आलेली कोयना एक्स्प्रेस पुण्यापासूनही विद्युत इंजिनसहच कोल्हापूरपर्यंत धावली. आज ती पुन्हा विद्युत इंजिनसह मुंबईच्या दिशेने रवाना झाली. रेल्वे स्थानकात पुणे विभागीय सल्लागार समिती सदस्य शिवनाथ बियाणी, स्टेशन प्रबंधक विजय कुमार, माजी उपमहापौर संजय मोहिते, रहीम सनदी आदींच्या उपस्थितीत या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. विद्युत इंजिनवर रेल्वे धावणार असल्याने इंजिन बदलण्यासाठी लागणारा वेळ, तसेच यासाठी लागणारे डिझेल याची मोठी बचत होणार आहे. सेंट्रल इलेक्ट्रिफिकेशन ऑर्गनायझेशनच्या अभ्यासानुसार 100 कि.मी. विद्युतीकरणामुळे रेल्वेची 4 दशलक्ष लिटर डिझेलची बचत होते. त्यातून 2500 कोटी परदेशी पैशाची देवाण-घेवाण वाचवता येते. 100 कि.मी.चे विद्युतीकरण झाले तर दरवर्षी 10 हजार 560 मेट्रिक टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन कमी होणार आहे.

 

Back to top button