कोल्हापूर : पूर नियंत्रण तयारीसाठी 5 दिवसांचा अल्टिमेटम | पुढारी

कोल्हापूर : पूर नियंत्रण तयारीसाठी 5 दिवसांचा अल्टिमेटम

कोल्हापूर : यावर्षीही जिल्ह्यात सरासरीइतक्या पावसाचा अंदाज आहे. यामुळे आताच तयारी करा, नंतर धावपळ नको, असा इशारा देत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत पूर नियंत्रण तयारीसाठी सर्व विभागांना पाच दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. बुधवारी (दि.8) याचा आढावा घेतला जाईल, तोपर्यंत सर्व कामांचे सुक्ष्म नियोजन झालेले असेल, असा गर्भीत इशाराही त्यांनी दिला.

पूरस्थितीचे नियंत्रण करण्यासाठी सर्व विभागांच्या जबाबदार्‍या निश्चित करण्यात आल्या होत्या. त्यानुसार संबधित सर्व विभागांना दि.26 मे रोजी पत्र देण्यात आले होते. त्यानुसार कामे पूर्ण झाली की नाही, याचा आढावा शुक्रवारी जिल्हाधिकार्‍यांनी घेतला. प्रत्येक विभागाने दिलेली जबाबदारी किती पार पाडली, अशी विचारणा केली. पूरबाधीत भागात खाजगी बोअरवेल अधिग्रहण करणे, जिथे महिला कर्मचारी आहे त्यांच्यासोबतीला आणखी एका कर्मचार्‍याची नियुक्ती, धरणक्षेत्रावर अखंडित वीजपुरवठा, पुरग्रस्त नागरिकांच्या स्थलांतरासाठीच्या जागा निश्चित करणे, त्यांना पिण्याचे पाणी, निवारा, जेवण, वैद्यकीय सेवा, जनावरांसाठी चारा पुरवणार्‍या संस्था, पोकलँड, डंपर, जेसीबी पुरवणार्‍यांची माहिती घेऊन त्यांच्यासोबत करार करणे आदींसह पुरस्थितीत कराव्या लागणार्‍या सगळ्या उपाययोजनांचा जिल्हाधिकार्‍यांनी आढावा घेतला.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद बांधकाम, ग्रामीण पाणी पुरवठा, आरोग्य, बीएसएनएल, महावितरण आदी संबधित सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Back to top button