राज्यसभा सहावी जागा : कोल्हापूरच्या दोन मल्लांमध्ये होणार ‘दंगल’ | पुढारी

राज्यसभा सहावी जागा : कोल्हापूरच्या दोन मल्लांमध्ये होणार ‘दंगल’

कोल्हापूर; अनिल देशमुख : राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha elections) दाखल केलेले अर्ज मागे घेण्याची मुदत आज (दि.३) दुपारी साडे तीन वाजता संपली. तिसऱ्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेने अर्ज दाखल केला आहे. परंतु दोन्हीही पक्षांकडून अर्ज कायम ठेवल्याने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले. ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे.

राज्यसभेची सहावी जागा प्रतिष्ठेची करत आता पारंपरिक प्रतिस्पर्धी भाजपने शिवसेनेसमोर शड्डू ठोकला. माजी खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी जाहीर करत रिंगणात उतरवले. यामुळे शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक या कोल्हापूरच्याच दोन मल्लांमध्ये आता जंगी लढत होणार आहे. पवारांना 16 तर महाडिकांना 21 मतांची गरज असून मैदान कोण मारणार याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या जागेसाठी शिवसेना आणि भाजपलाही विजयी मतांपर्यंत पोचण्यासाठी दमछाक करावी लागणार हे स्पष्टच आहे. त्यामुळे अपक्षांचा ‘भाव’ वाढणार असून घोडेबाजाराला उधाण येण्याची शक्यता आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी प्रारंभीपासून कोल्हापूर केंद्रस्थानी ठरले आहे. माजी खासदार संभाजीराजे यांनी अपक्ष म्हणून या जागेसाठी उमेदवारीची चाचपणी सुरू केली. महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून संभाजीराजे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडेल, अशी शक्यता होती; मात्र या सहाव्या जागेवर दावा सांगत संभाजीराजे यांना थेट शिवसेनेकडून लढण्याची ऑफर दिली. संभाजीराजे यांनी ती नाकारल्याने कोल्हापूरचाच शिवसेनेचा कट्टर कार्यकर्ता, जिल्हा प्रमुख संजय पवार यांना संधी देत शिवसेनेने त्यांना रिंगणात उतरवले आहे.

संभाजीराजे यांनी भाजपचे नेते, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही यापूर्वी भेट घेतली होती. मात्र, यापूर्वी दिलेल्या संधीसाठी आभार व्यक्त करण्यासाठीची ही भेट होती, असे संभाजीराजे यांनी सांगितले असले तरी त्यामागे अपक्ष म्हणून रिंगणात राहिलो तर मदत होईल, हाच या भेटीमागील उद्देश होता असे जाणकारांचे म्हणणे आहे. यासर्व पार्श्वभूमीवर भाजपने मात्र, ‘वेट अ‍ॅन्ड वॉच’ची भूमिका घेतली होती.

अपक्ष म्हणून संभाजीराजे आणि शिवसेनेचे संजय पवार यांच्यात लढत होईल, अशी काहींशी शक्यता निर्माण होऊ पाहत असतानाच संभाजीराजे यांनी थेट निवडणुकीतून माघारीच घोषणा केली. हे जाहीर करतानाच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शब्द फिरवल्याचा आरोप केला. यामुळे छत्रपती घराण्याची फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली. याचा फायदा घेत भाजपने निवडणुकीत पुन्हा चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, खुद्द संभाजीराजे यांचे वडील शाहू महाराज यांनीच संभाजीराजे यांचे वक्तव्य खोडून काढले. यामुळे राज्याचा संभ्रम दूर झाल्याचे शिवसेनेला वाटत आहे तर शाहू महाराज यांना चुकीची आणि तयार करून माहिती दिल्याचा भाजपाचा आरोप आहे. यासर्व पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचा दोन दिवसांचा कोल्हापूर दौरा, त्यात त्यांनी घेतली शाहू महाराज यांची भेट, मुख्यमंत्र्यांनी शाहू महाराज यांच्याशी केलेली चर्चा. यामुळे प्रतिष्ठेची ठरलेल्या या जागेसाठी शिवसेनेने कंबर कसायला सुरुवात केल्याचे चित्र दर्शवत होते. संभाजीराजे यांच्या माघारीने शिवसेनेच्या संजय पवार यांचा मार्ग सुकर होईल, ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी शक्यता निर्माण झाली असतानाच पारंपरिक प्रतिस्पर्धी भाजपाने कोल्हापूरचाच उमेदवार देऊन शिवसेनेला आव्हान दिले.

भाजपच्या संपर्कात कोण? गळाला किती लागणार

महाविकास आघाडीसोबत असलेल्या 13 अपक्ष आणि इतर 16 अशा 29 जणांवरच भाजपची मदार आहे. ज्या ताकतीने भाजपने सहाव्या जागेसाठी महाडिक यांना रिंगणात उतरवले, याचा अर्थ भाजपकडूनही मतांची गोळा बेरीज सुरू असून त्यात त्यांना काही प्रमाणात यश येताना दिसत असावे, असे जाणकारांना वाटते. शिवसेनेतील काही नाराज भाजपाच्या संपर्कात असल्याचीही चर्चा आहे. यामुळे भाजपच्या संपर्कात आणखी कोण, यासह आणखी किती जण गळाला लागणार, याचीही चर्चा आता सुरू झाली आहे.

राज्याच्या केंद्रस्थानी पुन्हा कोल्हापूर

लोकसभेच्या निवडणुकीपासूनच राज्याच्या केंद्रस्थानी कोल्हापूर आहे. ‘आमचं ठरलंय’ असे म्हणत काँग्रेसचे सतेज पाटील यांनी आघाडीचाच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिक यांना पराभूत केले. यानंतर भारतीय जनता पक्षात गेलेल्या महाडिकांची तेव्हापासून राज्यसभेसाठी चर्चा सुरू झाली. विधानसभा निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूर सोडून थेट पुण्यातून निवडणूक लढवली. राज्यात पहिल्या क्रमांकावर आलेल्या भाजपला मात्र कोल्हापुरात, प्रदेशाध्यक्षाच्या गावातच भोपळाही फोडता आला नाही. विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतही भाजपचे हे दोन्ही मतदारसंघ ‘महाविकास आघाडी’ने खेचले. स्थानिक स्वराज्य गटातील विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली. कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पोट निवडणुकीचीही राज्यभर चर्चा झाली.

पराभवाचे उट्टे की विजयी घोडदौड

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अनेक वर्षांचे स्वप्न 2019 च्या निवडणुकीत पूर्ण करत कोल्हापूरने शिवसेनेचे दोन खासदार दिले. यानंतर याच कोल्हापुरातून तिसरा खासदार देण्याची तयारी सुरू केली आहे. याउलट महाडिक यांना लोकसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर विधानसभा निवडणुकीतही महाडिक घराण्याला पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर विधान परिषदेतही माघार घ्यावी लागली. यानंतर आता पुन्हा महाडिक यांना संधी मिळाली आहे, ते आता पराभवाचे उट्टे काढणार की शिवसेना विजयी घोडदौड कायम ठेवणार याकडेही लक्ष लागले

पवारांना 16 तर महाडिकांना 21 मतांची गरज

महाविकास आघाडीकडे तीनही पक्षाची 152 मते आहेत. या मतांचा विचार करता शिवसेनेला पवार यांच्यासाठी 16 मतांची गरज आहे. महाविकास आघाडीकडे सध्या 13 अपक्ष आणि इतर 16 अशी जादा 29 मते आहेत. त्यामुळे या 16 मतांची कसर सहज भरून निघेल, असा विश्वास शिवसेनेला आहे. भाजपाकडे 105 मते आहेत. या मतांचा विचार करता महाडिक यांच्यासाठी 21 मतांची गरज आहे. भाजपाकडे 5 अपक्ष आणि 3 इतर अशी 8 मते आहेत. ही सर्व मते भाजपाला मिळाली तरी 13 मतांसाठी भाजपालाही कंबर कसावी लागणार आहे. महाविकास आघाडीसोबत असलेले 13 अपक्ष आणि 16 इतर अशा एकूण 29 पैकी 13 मतांसाठी भाजपचे प्रयत्न राहणार आहेत. पसंती मतदानामुळे हा नंबर गेमच ठरणार आहे. यामुळे घोडेबाजारही मोठ्या प्रमाणात होईल, अशीही शक्यता आहे. काहीही झाले तरी आता ही कुस्ती कोल्हापूरच्या दोन मल्लातच होणार असून राज्यसभेची खासदारकी कोल्हापुरातच येणार हे स्पष्ट आहे.

Back to top button