कोल्हापूर : सिरसे येथे घर कोसळले, पती, पत्नी ढिगाऱ्याखाली गाडले | पुढारी

कोल्हापूर : सिरसे येथे घर कोसळले, पती, पत्नी ढिगाऱ्याखाली गाडले

कौलव ; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्यातील सिरसे येथे अचानक घर कोसळल्याने चार जण ढिगाऱ्याखाली गेले होते. दरम्यान गावातील युवकांनी अडकलेल्यांना बाहेर काढले आहे. वयोवृध्द महिला व मुले सुदैवाने बाहेर पळाले. मात्र गावातील चार युवकानी ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या वसंत दत्तू कांबळे, पत्नी सुनिता यांना अक्षरशः मृत्युच्या जबड्यातून ओढून बाहेर काढले. वसंत कांबळे हे गंभीर जखमी असून अन्य चार जण किरकोळ जखमी झाले आहेत.

सिरसे (ता.राधानगरी) येथील वसंत कांबळे यांच्या घरात तीन खोल्यात तीन कुटुंबातील नऊ जण राहतात. ते सर्वीसिंग सेंटरवर नोकरी करतात. आज सुट्टी असल्याने घराच्या माळ्यावर झोपले होते. दुपारी पावणे एकच्या सुमारास अचानक घराच्या तीन भिंती कोसळल्याने ते ढिगाऱ्याखाली गाडले गेले. तर खालच्या मजल्यावर असणारी त्यांची पत्नी सुनिता ढिगाऱ्यात अडकल्याने आरडा ओरड करु लागल्या.

यावेळी घरातील तीन महिला आणि दोन मुलांनी घराबाहेर पाठीमागील बाजूने पळ काढला. ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत घराकडे धाव घेतली. सर्जेराव भाटले, नितीन नकाते, आनंदा कांबळे, सचिन कांबळे, यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून अर्धा तास कसरत करत वसंत कांबळे यांना बाहेर काढले. तसेच पत्नी सुनिता यांच्या साडीचा अडकलेला साडीचा पदर कापून बाहेर काढले. त्या जखमी असून बेशुद्धावस्थेतील वसंत यांना तातडीने कोल्हापूरातील रूग्णालयात दाखल केल्याने त्यांचे प्राण वाचले.

संपुर्ण घरच भुईसपाट झाल्यामुळे सुमारे चार लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. या घराच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या रंजना कांबळे, मारुती कांबळे, शिवाजी कांबळे यांच्या घरांचेही मोठे नुकसान झाले आहे.

घटनास्थळी तहसिलदार मीना निंबाळकर, पंचायत समितीच्या सभापती सौ.सोनाली पाटील सदस्य रविश पाटील,मोहन पाटील,गटविकास अधिकारी डॉ.संदीप भंडारी, तलाठी अरूण हनवते, ग्रामसेवक उत्तम पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.

देव तारी त्याला कोण मारी!

या दुर्घटनेने देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय आला.कांबळे पती पत्नीना तरूणांनी मृत्युच्या दाढेतून शब्दशः ओढून काढले. तर ९० वर्षांच्या तानुबाई दत्तू कांबळे , निलाबाई पांडुरंग कांबळे (वय४५),समीर वसंत कांबळे (वय १४)अरव वसंत कांबळे (वय ६) हे बाहेर पळून आल्याने बचावले.त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.तर काही कामानिमित्त घरात आलेले रघुनाथ पाटील व महादेव पाटील हे दुर्घटनेपुर्वी केवळ पाच मिनिटे आधी बाहेर पडल्याने बचावले.

Back to top button