पूरग्रस्त वृत्तपत्र विक्रेत्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप; दै. ‘पुढारी’ व पृथ्वीराज यादव यांचा संयुक्‍त उपक्रम | पुढारी

पूरग्रस्त वृत्तपत्र विक्रेत्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप; दै. ‘पुढारी’ व पृथ्वीराज यादव यांचा संयुक्‍त उपक्रम

कोल्हापूर ,पुढारी वृत्तसेवा:  ‘मोडून पडला संसार तरी, मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा…’ कवीवर्य कुसुमाग्रजांच्या कवितेच्या ओळी जिवंत होताना पाहायला मिळाल्या.

प्रसंग होता महापुराचा फटका बसलेल्या आणि संसार मोडून पडलेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांच्या पाठीवर थाप देत, त्यांना जगण्याचे नवे बळ देण्याचा. हीच ऊर्जा आणि प्रेरणा घेत शहर आणि जिल्ह्यातून आलेले विक्रेते, एजंट अक्षरश: भारावून गेले.

महापुराचा फटका बसलेले शहर व जिल्ह्यातले वृत्तपत्र विक्रेते व एजंटस् यांना दै. ‘पुढारी’ व भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज यादव यांच्या संयुक्‍त विद्यमाने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप गुरुवारी एका खास कार्यक्रमात करण्यात आले. अध्यक्षस्थानी दै. ‘पुढारी’चे कार्यकारी संपादक विजय जाधव होते.

वृत्तपत्र विक्रेत्यांना पृथ्वीराज यादव आणि त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या हस्ते धान्य व प्र्रापंचिक साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले.
पृथ्वीराज यादव म्हणाले की, स्वातंत्र्यलढ्यापासूनच दै. ‘पुढारी’ने सामाजिक लढ्यात पुढाकार घेतला आहे. संवेदनशीलतेसोबतच सामाजिक बांधिलकी जोपासत आज पूरग्रस्त वृत्तपत्र विक्रेते व एजंटना मदतीचा जो हात दिला त्याचे कौतुक करावे तितके कमी आहे.

ऊन, वारा, पाऊस आणि कोरोना संक्रमणाच्या काळातही मोठ्या धैर्याने वृत्तपत्र विक्रेत्यांनी वाचकापर्यंत वृत्तपत्रे पोहोच करण्याचे काम केले आहे. अशा वृत्तपत्र विक्रेत्यांना मदत करताना मला विशेष अभिमान वाटत आहे.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना कार्यकारी संपादक विजय जाधव म्हणाले, कोरोनाच्या झळा सर्वच क्षेत्रांना बसल्या; पण या स्थितीत ‘पुढारी’ने लसीकरण, कोरोनायोद्धे विक्रेत्यांचा सन्मान यासारखे उपक्रम राबवत या उपेक्षित घटकाला मोलाची साथ दिली.

वृत्तपत्र व्यवसायावर आधारित हजारो लोकांना जगण्याचे बळ दिले. दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव आणि चेअरमन डॉ. योगेश जाधव यांच्या संकल्पनेतून महापुराची झळ बसलेले विक्रेते, एजंट यांना मदत देण्याचा उपक्रम साकारत आहे.

दै. ‘पुढारी’चे सहायक सरव्यवस्थापक (वितरण) मिलिंद उटगीकर यांनी प्रास्तविक केले. ते म्हणाले, कोरोना, महापूर अशा कसोटीच्या वेळी दै. ‘पुढारी’ने खंबीर धोरण स्वीकारून अंकाचे सातत्य तर टिकविलेच शिवाय संपूर्ण महाराष्ट्रात प्रथमच विक्रेत्यांना कोरोनापासून संरक्षित करण्यासाठी लसीकरणही केले. आपल्या घरात महापुराचे पाणी असतानाही संकटाच्या काळात वृत्तपत्रे वाचकांच्या घरी पोहोचण्याचे काम विक्रेते व एजंटांनी यशस्वीरीत्या केले.

महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सचिव रघुनाथ कांबळे म्हणाले, वृत्तपत्र विक्रेता जेव्हा संकटात सापडला आहे त्यावेळी दै. ‘पुढारी’ने वृत्तपत्र विक्रेत्यांना मदत व धीर देण्याचे काम केले आहे. गेले वर्षभरात विक्रेत्यांसाठी कोरोना योद्धा सन्मान सोहळा, पालक दिन, विक्रेत्यांचे लसीकरण, महिला दिन असे अनेक कार्यक्रम घेतले आहेत. आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून वृत्तपत्र विक्रेत्यांच्या पाठीवर हात ठेवून त्यांना लढण्याचे बळ देण्याचे काम करण्यात आले आहे.

परिपूर्ण किट

या किटमध्ये तांदूळ, गहू, मसाले, तेल, चटणी, मीठ व गव्हाचे पीठ, साखर, चहा पूड, डाळी, हळद पावडर यासह ब्लँकेट, चटई व पाण्याच्या बाटल्यांसह इतर आवश्यक वस्तूंचा समावेश होता.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहायक वितरण व्यवस्थापक उत्तम पालेकर, रवींद्र पाटील, उमेश सूर्यवंशी, अक्षय पाटील व इतर कर्मचारी वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाला शिरोळचे नगरसेवक दादासाहेब कोळी, इम्रान अत्तार, शिरटीचे माजी सरपंच अभय गुरव, जब्बार मिस्त्री, कोल्हापुरातील ज्येष्ठ व्यावसायिक सुभाष नागेशकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. महानगर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष रवींद्र लाड, संघटक शंकर चेचर, स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष किरण व्हनगुत्ते, महालक्ष्मी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष केदार पाटील, सदस्य हिंदुराव कदम, संभाजीनगर डेपोचे अध्यक्ष बजरंग पाटील, राजारामपुरी डेपोचे अध्यक्ष प्रफुल्ल कोतमिरे, संघटक रमेश जाधव, कावळा नाका डेपोचे अध्यक्ष कृष्णात शहापुरे, श्रीकांत सावेकर, सुरेंद्र चौगुले, सुरेश ब्रह्मपुरे, श्रीपती शियेकर, समीर कवठेकर, शरद काळे, सुभाष औंदकर आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी हॉल उपलब्ध करून देऊन कोल्हापूर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटी यांचे विशेष सहकार्य केले.
सहायक वितरण व्यवस्थापक अमर पाटील व ‘पुढारी’ प्रयोग सोशल फाऊंडेशनचे समन्वयक विक्रम रेपे यांनी सूत्रसंचालन केले. सहायक वितरण व्यवस्थापक शिवाजी पाटील यांनी आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे चित्रीकरण रवींद्र बागल यांनी केले. ऑनलाईनसाठी संवाद स्नेहा मांगूरकर यांनी साधला.

शिरोळमध्ये होणार वृत्तपत्र एजंट व विक्रेत्यांना मदत

शिरोळ तालुका व इचलकरंजी शहर परिसरातील एजंट व विक्रेत्यांना शनिवार, दि. 14 ऑगस्ट रोजी मदतीचे वाटप करण्यात येणार आहे. सदरचा कार्यक्रम नाना कॉम्प्लेक्स, शिरोळ-जयसिंगपूर रस्ता, गणेशनगर शिरोळ येथे सकाळी 11 वाजता होणार आहे.

दिवंगत वृत्तपत्र विक्रेते व एजंटाना श्रद्धांजली

कार्यक्रमाची सुरुवात दिवगंत वृत्तपत्र विक्रेते व एजंट बाळासाहेब सावरतकर (बिद्री), मेहबूब झंजी (साळवण), शिवाजी पाटील (पुलाची शिरोली), सुभाष बारदेसकर (मुरगूड), वसंत कांदेकर(भोगावती), कुमार कुपटे (कोल्हापूर शहर) यांना सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात आली.

 

Back to top button