वळवाने केली कोल्हापूरची दाणादाण | पुढारी

वळवाने केली कोल्हापूरची दाणादाण

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
मान्सूनने जोर धरण्याच्या आधीच वळवाच्या वादळी पावसाने गुरुवारी संध्याकाळी कोल्हापूरकरांची पार दाणादाण उडविली. ताशी 20 ते 30 किलोमीटर वेगाने वाहणार्‍या वार्‍यांसह अचानक चौफेर बरसलेल्या धुवांधार पावसाने नागरिकांची त्रेधातिरपिट उडविली. अवघ्या 29 मिनिटांत 15.8 मि.मी. पाऊस कोसळला. अर्धा तासच पावसाने थैमान घातले; मात्र याची तीव्रता एवढी होती की, जणू ढगफुटी झाली की काय, असे वाटत होते. या मुसळधार पावसाने अनेक घरांत, दुकानांत पाणी शिरले. तीव्र वादळ आणि झाडे कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे सायंकाळी पाचपासून अर्ध्याहून अधिक शहर रात्री उशिरापर्यंत अंधारात होते. 85 हून अधिक ठिकाणी झाडे मोडून रस्त्यावर पडली. संपूर्ण शहरातील वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती. दैव बलवत्तर म्हणून शहरात कोणतीही जीवित हानी झाली नाही.

शहरात सकाळपासून प्रचंड उकाडा होता. दुपारी तापमानात मोठी वाढ होऊन पारा 36 अंशाच्याही पुढे गेला. उन्हाचे चटके आणि प्रचंड उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना दुपारी चारनंतरझालेल्या ढगाळ वातावरणाने काहीसा दिलासा मिळाला. सायंकाळी पाच वाजता तर शहरात लाईट लावून वाहने चालवावी लागत होती. एवढा अंधार पडला.त्यानंतर आलेल्या पावसाचा एवढा जोरदार तडाखा बसेल याची कल्पना आली नाही. सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वारा सुरू झाला. काही वेळातच गारांच्या वर्षाव आणि विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. अवघ्या दोन-तीन मिनिटांतच पावसाचा जोर इतका वाढला की, दोन-तीन फूट अंतरावरीलही काही दिसत नव्हते.

धावत्या चारचाकीवर झाड पडले

जोरदार पावसाने नागरिकांची त्रेधातिरपिट उडाली. जागा असेल, त्या दिशेने लोक पळत होते. मिळेल त्या ठिकाणी आसरा घेत लोक थांबले होते. काही वेळातच पावसासह जोरदार वार्‍याने झाडे उन्मळून पडण्यास सुरवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झाड पडल्याने पुरवठा विभागातील एका महिला कर्मचार्‍यांच्या दुचाकीचा चुराडा झाला; तर एका कर्मचार्‍यांच्या दुचाकींचे मोठे नुकसान झाले. कनाननगर परिसरात मार्शल हॉलनजीक एका घरावर झाड पडले. राजारामपुरीत दहावी गल्‍लीत चारचाकीवर झाड कोसळले. टाकाळा ते विजय बेकरी रस्त्यावरही धावत्या चारचाकीवर झाड पडले. चारचाकीतील चालकाला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. याच परिसरात झाड पडल्याने एका ठिकाणी गॅस गळती सुरू झाली. रेल्वे फाटक येथील मंडईत उंबंराचे मोठे झाड कोसळले. आयटीआय परिसर, पार्वती टॉकीज, शासकीय विश्रामगृह, महावीर गार्डन रोड, रेल्वे फाटक, परिख पूल, टेंबलाईवाडी आदी शहराच्या बहुतांशी सर्वच भागात झाडे पडली. पडलेली ही झाडे बाजूला करताना अग्‍निशमन विभागाची अक्षरश: दमछाक सुरू होती. होती नव्हती ती सर्व यंत्रणा झाडे काढण्यासाठी कामाला लावण्यात आली होती. राजारामपुरी परिसरात जेसीबीच्या मदतीने झाडे बाजूला केली जात होती. सायंकाळी साडेसहापर्यंत अग्‍निशमन दलाकडे झाडे पडलेल्या सुमारे 54 वर्दी दाखल झाल्या होत्या. शहर आणि परिसरात सुमारे 85 हून अधिक मोठी झाडे पडली. यासह झाडाच्या फांद्या, अत्यंत छोटी झाडे पडणे अशा सुमारे शंभरहून अधिक घटना घडल्या.

विजेच्या खांबासह वाहिन्या तुटल्या

मध्यवर्ती बसस्थानक ते परिख पूल मार्गावर तसेच रेल्वे फाटक ते साईक्स एक्स्टेंशन या मार्गावर वीज वाहिन्या तुटल्या. यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. महावितरणाच्या कर्मचार्‍यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तुटलेल्या वीज वाहिन्या बाजूला केल्या. जिल्हा परिषदेजवळ विजेचा खांबच उन्मळून पडला. शहरात अनेक ठिकाणी होर्डिंग्जच्या अक्षरश: चिंध्या झाल्या. मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील एका मोठ्या हॉटेलचे होर्डिंग कोसळले. सुदैवाने त्यामध्ये कोणतीही हानी झाली नाही.

उजळाईवाडीला शाळेचे छतच उडाले

शहरालगतच्या उजळाईवाडी येथील प्राथमिक शाळेचे छतच उडून गेले. रंकाळ्यातील नौकाविहारही बंद करण्यात आला.
कुंभार गल्‍लीत पाणी शिरले. पावसाचा जोर इतका होता, की अवघ्या पाच-दहा मिनिटांतच गटारी भरून वाहू लागल्याने शहरातील अनेक रस्त्यांनाच गटारी, नाल्याचे स्वरूप आले. उतारावरून तर पाण्याचे अक्षरश: लोंढे वाहत होते. अनेक ठिकाणी या पाण्यात रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकींची निम्याहून अधिक चाके बुडाली होती. गंगावेश ते रेगे तिकटी या मार्गावर वाहत आलेले पाणी अनेक दुकानांत शिरले. जयंती नाला अवघ्या काही मिनिटांत दुथडी भरून वाहत होता. शाहुपुरी येेथील सहावी गल्‍ली, कुंभार गल्‍लीच्या काही भागात घरात पाणी शिरले. अचानक शिरलेल्या पाण्याने गणेशमूर्तींसह साहित्य सुरक्षितस्थळी नेताना लोकांची चांगलीच धावपळ उडाली.

रस्त्यांना तळ्याचे स्वरूप

परिख पुलात सुमारे दीड ते दोन फूट पाणी साचले. यामुळे त्यातून होणारी वाहतूक बंदच झाली. ताराराणी चौकात वटेश्‍वर मंदिराच्या दिशेने अर्धा ते पाऊण फूट पाणी साचले. त्यातून मार्ग काढताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत होती. हे पाणी बाजूच्या दुकानातही शिरले. राजारामपुरी, साईक्स एक्स्टेंशन, दाभोळकर कॉर्नर, व्हिनस कॉर्नर, सीपीआर चौक, जयंती नाला पूल, जिल्हाधिकारी कार्यालय आदी परिसरात रस्त्यावर अर्धा फुटापेक्षा जादा पाणी साचले होते. दुधाळी, गांधी मैदानासह अनेक मैदानांना तळ्याचे स्वरूप आले होते. शाहू स्टेडियमवरील फुटबॉल सामना, खासबागेतील कुस्ती स्पर्धा थांबवाव्या लागल्या. बागांमधील गर्दीही पूर्ण कमी झाली.

वाहतुकीवर परिणाम

पाऊस सुरू असताना रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे मंदावली होती. पाऊस थांबल्यानंतर मात्र शहराच्या बहुतांशी सर्वच रस्त्यावर वाहनांची गर्दी झाली. यामुळे रात्री आठ-साडेआठपर्यंत ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती. व्हीनस कॉर्नर ते रेल्वे स्थानक, दाभोळकर कॉर्नर ते वटेश्‍वर मंदिर, ताराराणी चौक ते अगदी उड्डाणपूल अशा अनेक रस्त्यांवर वाहनांच्या रांगा होत्या. एरव्ही दोन-तीन मिनिटांचे अंतर पार करण्यास दहा ते पंधरा मिनिटांपेक्षा अधिक कालावधी लागत होता.

सोमवारपर्यंत दुपारनंतर पाऊस

कोल्हापूर शहरात सोमवार दि. 6 पर्यंत दुपारनंतर वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस होईल, अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्‍त केली आहे. त्यानंतर मंगळवार आणि बुधवारी काही भागात विजेच्या कडकडाटासह मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल, असाही अंदाज आहे.अग्‍निशमन विभागाची कसरत शहराच्या अनेक भागांत झाडे पडली, वीज वाहिन्या तुटल्या, पाणी तुंबले. या सर्व ठिकाणी पोहोचण्यास अग्‍निशमन विभागाला अक्षरश: कसरत करावी लागत होती. सर्व अग्‍निशमन केंद्रांतील दोन कर्मचारी वगळता बहुतांशी सर्व कर्मचारी घटनास्थळी पाठवले जात होते. सायंकाळी साडेपाचनंतर या विभागातील दूरध्वनी उशिरापर्यंत खणाणतच होते. जवळच्या भागात गेलेल्या बंबाची कल्पना देत त्याठिकाणी संपर्क साधण्याचे आवाहनही नागरिकांना केले जात होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या रेस्क्यू फोर्सचे जवानही मदतीसाठी पाठवण्यात आले.

अर्धा तासाच्या पावसाने दैना; पावसाळ्यात काय?

शहरात अवघा अर्धा तास मुसळधार पाऊस झाला. ठिकठिकाणी झाडे पडली. घरे, दुकानांत पाणी शिरले. वीज वाहिन्या तुटल्या, खांब पडले, रस्ते जलमय झाले. यावर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा जादा पावसाचा अंदाज आहे. त्यातच मान्सूनपूर्व केवळ अर्धा तास झालेल्या पावसाने शहराची ही परिस्थिती होत असेल तर पावसाळ्यात शहराची अवस्था काय होणार, असा सवाल नागरिकांतून व्यक्‍त केला जात आहे.

Back to top button