करिअरचा राजमार्ग गवसला! ; ‘एज्युदिशा’ प्रदर्शनाचा समारोप | पुढारी

करिअरचा राजमार्ग गवसला! ; 'एज्युदिशा’ प्रदर्शनाचा समारोप

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : ‘एज्युदिशा’ प्रदर्शनात विद्यार्थ्यांना करिअर निवडण्यासाठी 15 हून अधिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. विद्यापीठे, शैक्षणिक संस्था क्लासेस अशा नामांकित संस्थांची स्टॉलच्या माध्यमातून झालेली ओळख यातून विद्यार्थ्यांना करिअरचा नवा राजमार्ग सापडला. एकाच छताखाली ज्ञानसत्रात सहभागी होण्याची संधी उपलब्ध झाल्याने विद्यार्थी, पालकांनी समाधान व्यक्त केले.

दै. ‘पुढारी’ आयोजित व संजय घोडावत युनिव्हर्सिटी प्रस्तुत ‘एज्युदिशा 2022’ शैक्षणिक प्रदर्शनाचा ताराराणी विद्यापीठाच्या व्ही. टी. पाटील मेमोरियल हॉलमध्ये उत्साहात समारोप झाला. एज्युदिशा प्रदर्शनाचे पॉवर्ड बाय स्पॉन्सर आयआयबी-पीसीबी, लातूर होते. सहयोगी प्रायोजक एमआयटी-एडीटी युनिव्हर्सिटी पुणे व प्रा. मोटेगावकर सरांचे आरसीसी क्लासेस, लातूर होते. अजिंक्य डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, पुणे व सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पुणे हे सहप्रायोजक होते. प्रदर्शनाच्या उद्घाटनापासून शेवटच्या दिवसाअखेर विद्यार्थी, पालकांची गर्दी होती. तीन दिवसांच्या ज्ञानसत्रात उच्चशिक्षण, फॉरेन्सिक अकौंटिंग, हॉटेल मॅनेजमेंट, नीट, सीईटी परीक्षा तयारी, कौशल्यावर आधारित कोर्स, नॅनो टेक्नॉलॉजी संशोधन, करिअर, परदेशी शिक्षण, स्पर्धा परीक्षा, व्हीएफक्स व अ‍ॅनिमेशनचे क्षेत्र, जैव तंत्रज्ञान व पर्यावरण अभियांत्रिकी आदी विषयांवर राज्यभरातील तज्ज्ञ मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

एकाच व्यासपीठावर करिअर घडविण्यासाठीचे मार्गदर्शन आणि त्यासाठी आवश्यक अभ्यासक्रम शिकविणार्‍या राज्यातील विविध ठिकाणच्या शैक्षणिक संस्थांची ओळख विद्यार्थी, पालकांना झाली. मेडिकल, इंजिनिअरिंग, इतर कोर्सेस, व्यावसायिक अभ्यासक्रम, परदेशी शिक्षणाच्या संधी, जॉबच्या संधीबद्दल अद्ययावत माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. त्यामुळे आगामी शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्याना एज्युदिशाच्या माध्यमातून यशस्वी करिअर करण्याची गुरुकिल्ली सापडली.

Back to top button