

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. 31) केशवराव भोसले नाट्यगृहात सकाळी 11 वाजता आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. यामध्ये कोणाचा प्रभाग खुला झाला आणि कोणाच्या प्रभागावर आरक्षण आले, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सोडत स्थळापासूनच इच्छुकांचा जल्लोष सुरू होणार आहे. मनपा निवडणुकीचे रणांगण रंगणार आहे.
या निवडणुकीसाठी अनुसूचित जाती 12 जागांपैकी 6 महिला, अनुसूचित जमातीसाठी एक जागा असल्याने पुरुष की महिला याचा निर्णय चिठ्ठी टाकून घेतला जाईल. त्याचबरोबर सर्वसाधारण महिलासाठीही आरक्षण सोडत होईल. 1 जून रोजी हे प्रारूप प्रसिद्ध होईल. 6 जूनपर्यंत त्यावर मनपाच्या ताराबाई पार्कातील मुख्य निवडणूक कार्यालयात हरकती व सूचना देता येतील.
अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे आरक्षण निश्चित झाले आहेत. सर्वसाधारण प्रवर्गातील 39 किंवा 40 जागांवर चिठ्ठ्या टाकून महिलांचे आरक्षण निश्चित केले जाईल. महिलांसाठी 50 टक्के आरक्षित जागा असून, एकूण 92 जागांपैकी 46 जागा महिलांसाठी राखीव आहेत. सोमवारी मनपाने आरक्षण सोडतीची रंगीत तालीम घेतली. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, सहायक आयुक्त विनायक औंधकर, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, निवडणूक अधीक्षक सुधाकर चल्लावाड उपस्थित होते.
अनुसूचित जाती प्रवर्ग – 12 (पैकी 6 महिला)
अनुसूचित जमाती प्रवर्ग – 1 (महिला किंवा पुरुष)
सर्वसाधारण प्रवर्ग – 79 (पैकी 39 किंवा 40 महिला)