कोल्हापूर : महाविकास आघाडीतील बेदिली चव्हाट्यावर | पुढारी

कोल्हापूर : महाविकास आघाडीतील बेदिली चव्हाट्यावर

कोल्हापूर ; सुरेश पवार : महाराष्ट्रातील सत्तारूढ त्रिपक्षीय महाविकास आघाडीतील बेदिली शनिवारी कोल्हापुरात जाहीरपणे चव्हाट्यावर आल्याने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातील अंतर्गत कुरबुरी तीव्र झाल्याचे समोर आले आहे. याअंतर्गत असंतोषाचे पडसाद आगामी महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या यांच्या निवडणुकांमध्ये उमटल्याशिवाय राहणार नाहीत.

शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी शनिवारी जाहीर सभेत पालकमंत्री सतेज पाटील यांचे नाव न घेता घणाघाती टीका केली. ‘आमचं ठरलंय’ हे आता चालणार नाही, असे म्हणणार्‍यांनाही आता घरी बसवू, असा थेट इशाराच त्यांनी दिला. शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनीही त्यांची ‘री’ ओढली आणि जिल्हा परिषद मतदारसंघाच्या रचनेबद्दल जाहीर तक्रार केली. त्यांचाही रोख राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर होता. राऊत यांच्या जाहीर शरसंधानाने आघाडीत सबकुछ आलबेल नाही, हेच दिसून आले.

सत्तेसाठीच एकत्र

शिवसेना आणि काँग्रेस यांच्या विचारसरणीत कमालीची तफावत आहे. तरी सत्तेसाठी काँग्रेस पक्ष राजी झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेसाठीच आवळ्या-भोपळ्याची मोट मान्य केली आहे आणि सत्तेच्या माध्यमातून आपल्याच पोळीवर तूप ओतून घेण्याचा सपाटा चालवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या पदरात मलईदार खाती घेतली आहेतच. त्याशिवाय आपल्या पक्षाच्या आमदारांना निधीमध्ये झुकते माप मिळेल, अशीही चलाखी केली आहे. राष्ट्रवादीच्या या शिरजोरीविरोधात काँग्रेस पक्षाने जाहीर आवाजही उठवला आहे; पण काही फरक पडलेला नाही.

गोंदिया आणि भंडारा जिल्हा परिषदांच्या पदाधिकारी निवडीत राष्ट्रवादीने दगाबाजी केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अलीकडेच केला होता. आता शिवसेनेनेही जाहीरपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीकास्त्र सोडले आहे. कोल्हापूरचा महापौर आमच्या सहकार्याशिवाय होणारच नाही आणि जिल्ह्यातील याआधीचे शिवसेनेचे सहा आमदार पुन्हा निवडून आणू, असे जाहीर आव्हानच संजय राऊत यांनी दिले आहे. एकप्रकारे आगामी रणनीतीच त्यांनी स्पष्ट केली आहे.

आगामी निवडणुका बहुरंगी होण्याची चिन्हे

या पार्श्वभूमीवर महापालिका आणि जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढवल्या जाण्याची शक्यता धूसर आहे. या निवडणुका चौरंगी आणि बहुरंगी होण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेने त्या वाटेवर आपले पाऊल टाकल्याचे स्पष्ट झाले आहे.

Back to top button