वीर जवान प्रशांत जाधव अनंतात विलीन, वीरपत्नीचं सौभाग्याचं लेणं कायम 

वीर जवान प्रशांत जाधव अनंतात विलीन, वीरपत्नीचं सौभाग्याचं लेणं कायम 

हलकर्णी : पुढारी वृत्तसेवा :  वीर जवान प्रशांत जाधव अमर रहे…, भारत माता की जय…' अशा गगनभेदी घोषणांनी बसर्गेचे सुपूत्र प्रशांत शिवाजी जाधव यांच्या पार्थिवावर रविवारी दुपारी लष्करी इतमामात मूळगावी बसर्गे (ता. गडहिंग्लज) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पंचक्रोशीसह तालुक्यातील हजारो नागरिकांनी लाडक्या वीर सुपूत्राला साश्रू नयनांनी निरोप दिला.

शुक्रवारी सकाळी लडाख सेक्टरमध्ये बस दुर्घटनेत प्रशांत यांना वीरमरण आले. त्यांचे पार्थिव गावी कधी येणार याच्या प्रतीक्षेत दोन दिवसांपासून ग्रामस्थ होते. रविवारी सकाळी बारा वाजता त्यांचे पार्थिव गावात आणण्यात आले. भारत माता की जय… वीर जवान अमर रहे….अशा घोषणांसमवेत गावातील प्रमुख मार्गावरून लष्कराच्या सजवलेल्या वाहनातून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा महिला, आबालवृद्ध, युवकांनी प्रचंड गर्दी केली होती. जाधव यांच्या निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी त्यांची आई रेणुका, पत्नी पद्मा, वडील शिवाजी यांच्यासह नातेवाईकांच्या आक्रोशाने उपस्थितांचे डोळे पाणावले.

यानंतर एस. एम. हायस्कूलच्या पटांगणावर पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी उपस्थित मंत्री, प्रशासकीय अधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले. सैन्यदलाच्या वतीने लेफ्टनंट कर्नल नवीन एम व लेफ्टनंट कर्नल सुभाष एस. यांनी मानवंदना दिली. वडील शिवाजी व कन्या चिमुकली नियती यांनी पार्थिवाला भडाग्नी दिला. लष्करी जवानांनी व पोलीस दलाने बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली.

वीरपत्नीचं सौभाग्याचं लेणं कायम

जाधव कुटुंबीयांनी राज्यातील विधवा प्रथाबंदीला बळ देत हजारो जनसमुदायाच्या साक्षीने वीरपत्नी पद्मा हिचं सौभाग्याचं लेणं कायम ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. राज्यातील ही पहिलीच वीरपत्नी ठरली. पालकमंत्र्यांनी विधवा प्रथाबंदीला बळ दिल्याबद्दल जाधव कुटुंबीयांचे शासनाच्या वतीने आभार मानले.

पालकमंत्री सतेज पाटील, आ. राजेश पाटील, माजी मंत्री भरमू पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलिसप्रमुख शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, आजी-माजी सैनिक, विविध गावांचे सरपंच, पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

तीन कि.मी.च्या रांगा….

वीर जवान जाधव यांना अभिवादन करण्यासाठी पंचक्रोशीतील सर्वच रस्त्यांवर गर्दी होती. प्रशांत हे जय भवानी तरुण मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते होते. त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. गेले दोन दिवस त्यांचे मित्र अंत्यसंस्काराच्या तयारीसाठी झटत होते. आज लाडक्या प्रशांतचे पार्थिव पाहून मित्रांना अश्रू अनावर झाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news