

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : पैशाच्या जोरावर आमचं ठरलंय, हे आता चालणार नाही. आम्हाला विचारल्याखेरीज काही होणार नाही, अशा शब्दांत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला शनिवारी ठणकावले. आघाडीचे नंतर बघू, आधी विधानसभेच्या गेलेल्या जागा परत आणू, त्याची सुरुवात महापालिकेवर भगवा फडकवून करा, असे आवाहन करत शिवसेनेला बदनाम करण्यासाठी, समाजात तेढ निर्माण करण्यासाठी, भाजपने कारस्थान रचले, संभाजीराजे यांचा वापर केला, असा हल्लाबोलही त्यांनी केला.
शिवसंपर्क अभियानाच्या दुसर्या टप्प्याला कोल्हापुरातून शनिवारी प्रायव्हेट हायस्कूल येथील राऊत यांच्या सभेने सुरुवात झाली. आता आमचं ठरलंय, हे आम्ही ठरवूही देणार नाही. आता पडद्याआडचे राजकारण नको, असे सांगत राऊत यांनी कोल्हापूरला आता तीन खासदार होताहेत. आता चार नगरसेवकांवर थांबायचे नाही. कोल्हापूरचा महापौर शिवसेनेच्या मदतीशिवाय होणार नाही, याची दक्षता घ्या. जे काय ठरवायचे आहे, ते शिवसेनेला डावलून आता काही होणार नाही. जे ठरेल ते शिवसेना ठरवणार, असे सांगत विधानसभेला संकट आले. पण, आता पुन्हा कोल्हापुरात भगवा फडकेल असे काम करा. प्रत्येक निवडणूक निकराने लढा.
राज्यसभेची सहावी जागा शिवसेनेचीच आहे, ती राहणार. आम्ही संभाजीराजे यांना सन्मानाने शिवसेनेत या, असे आवाहन केले होते. मात्र भाजपने कपट केले. पण शाहू महाराज यांनी हा संभ-म दूर केला. कोल्हापूरची भूमी ही क्रांतिकारी आहे. या भूमीत अजूनही सत्य, प्रामाणिकपणा आहे. छत्रपती घराण्याचा अभिमान आहे, हे शाहू महाराज यांनी दाखवून देत हा वाद निरर्थक असल्याचे स्पष्ट केले. यामुळे शिवसेनेने संभाजीराजे यांची कोंडी केली म्हणणार्या भाजपचीच आता कोंडी झाली आहे. शाहू महाराज यांनीच भाजपचा मुखवटा फाडला आहे, असे राऊत म्हणाले.
देशात आता अन्न, वस्त्र, निवारा, बेरोजगारीवर चर्चा होत नाही; तर टोपी, लाऊड स्पीकर, अजान यावर होते. आम्ही बोललो की देशद्रोही. नंतर ईडी, सीबीआय मागे लावायचे. पण शिवसेना झुकणार नाही, महाराष्ट्र वाकणार नाही, असे राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य चालले आहे. पण त्यांना बदनाम करायचे. हे सरकार पाच वर्षे चालणार, त्यापुढेही पुढची 25 वर्षे चालणार, असेही त्यानी सांगितले.
'चंपा'बद्दल बोला
राऊत बोलत असताना, उपस्थितांतून 'चंपा'बद्दल बोला, असा सूर आला. त्यावर राऊत म्हणाले, तीच काय, चंपाबाई, ती आता कोल्हापुरात जास्त येत नाही असे ऐकले, असे सांगत अधिक भाष्य करण्याचे टाळले.
शाहू महाराज आजही मनाने शिवसैनिकच
शिवसेनेने छत्रपती घराण्याचा कायम मान राखला आहे, असे सांगत शाहू महाराज आजही मनाने शिवसैनिक आहेत. ते आजही दिसले. भाजपने आता तरी शहाण्यासारखे वागावे, कपट, कारस्थान करण्याचे बंद करावे, असेही राऊत यांनी सांगितले.
आम्हीच आलो; आता घालवून दाखवा
देवेंद्र फडणवीस दहा वेळेला बोलले, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन… पण आम्ही येऊन दाखवतो आणि सांगतो. आता आलोय, आम्हाला घालवूनच दाखवा, असे आव्हान त्यांनी दिले.
आमचे हिंदुत्व पळपुटे, पाठीत खंजीर खुपसणारे नाही
नवे हिंदुत्ववादी तयार होत आहेत. त्यांच्या खांद्यावर भाजपने भोंगा ठेवला. आमचे हिंदुत्व पळपुटे, पाठीत खंजीर खुपसणारे नाही, असे सांगत आम्ही 15 तारखेला अयोध्येला जात आहोत, आतापासूनच आमच्या स्वागताची तयारी सुरू आहे. कारण आमचे रामाशी नाते राजकारणाचे नाही. बाबरीचा घुमट पाडण्यापासून ते मंदिराची वीट रचेपर्यंतचा आमचा संबंध आहे. बाबरीबाबत नऊ वेळा साक्ष दिल्याचे राऊत म्हणाले. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणुकीत आघाडी करायची की युती याचा विचार न करता स्वबळावर लढण्याची तयारी करा, असे आवाहन संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी केले.
शिवसेना उमेदवाराच्या कोंडीसाठी चुकीची प्रभाग रचना
माजी आ. चंद्रदीप नरके यांनी, शिवसेनेच्या आमदारांची संख्या पुन्हा वाढवायची असेल तर आपल्यातील मतभेद दूर केले पाहिजेत. सरकारमध्ये आपल्या सोबत असणारे चतुर आहेत. सत्ता आणि पैशाच्या जोरावर ही मंडळी आपल्याला हवे तसे करून घेत आहेत. शिवसेनेचा उमेदवार अडचणीत यावा यासाठी या मंडळींनी महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी चुकीच्या पद्धतीने प्रभाग रचना केल्याचा आरोप केला.
सामान्य कार्यकर्त्याला केवळ शिवसेनाच आमदार, खासदार करू शकते हे पुन्हा एकदा शिवसेनेने आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला राज्यसभेची उमेदवारी देऊन दाखवून दिल्याचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी सांगितले. शिवसेनेला सोबत घेतल्याशिवाय कोणाचाही महापौर होणार नाही हे दाखवून देऊ, असे आव्हान देऊन जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांवर भगवा फडकवू, असे सांगितले.
अंकुश निपाणीकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी खा. संजय राऊत यांचा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या वतीने ऋतुराज क्षीरसागर यांनी चांदीची तलवार देऊन सत्कार केला. यावेळी शहर प्रमुख जयवंत हारुगले, शिवाजी जाधव, माजी आ. सुरेश साळोखे, हर्षल सुर्वे, प्रकाश शिरोळकर, मुंबईच्या माजी महापौर श्वेता जाधव, विनायक साळोखे, मंगल साळोखे, पूजा भोर आदी उपस्थित होते.