तरुणांना लुटणार्‍या दोघा तोतया पोलिसांना बेड्या | पुढारी

तरुणांना लुटणार्‍या दोघा तोतया पोलिसांना बेड्या

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : क्रॉईम बॅचचे पोलिस असल्याची बतावणी करून कॉलेज तरुण- तरुणींना अटक करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडील रोख रकमेसह मौल्यवान ऐवज लुटणार्‍या मोरेवाडी नाका (ता. करवीर) परिसरातील दोघा भामट्यांना राजारामपुरी पोलिसांनी शनिवारी बेड्या ठोकल्या. अक्षय सुनील बाटुंगे (वय 27), अंकुश महेश बाटुंगे (25, रा. कंजारभाट वसाहत) अशी त्याची नावे आहेत. शाहू टोलनाका परिसरात सापळा रचून कारवाई करण्यात आली.

संशयितांकडे कसून चौकशी करण्यात येत आहे. शहरासह उपनगरे, ग्रामीण भागात अलीकडच्या काळात घडलेल्या अनेक गुन्ह्यांचा छडा लागण्याची शक्यता असल्याचे पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी सांगितले. संशयितांकडून लूटमार झालेल्या कॉलेज तरुण-तरुणींनी तत्काळ राजारामपुरी पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वैभव हौसिंग सोसायटी परिसरातील मोकळ्या मैदानावर फिरण्यासाठी कॉलेज तरुण-तरुणी येत असतात. शिवाय मार्निंग-इव्हिनिंग वॉकसाठीही गर्दी असते. सायंकाळच्या दरम्यान कॉलेज तरुण-तरुणींना गाठून आम्ही पोलिस आहोत. परिसरात गस्त घालत आहोत. तुम्ही मोकळ्या जागेत काय करता आहात, पोलिस ठाण्यात चला, आई-वडिलांना बोलावून घेऊन त्याच्ंया कानावर या गोष्टी घालू, अशी भीती दाखवून तरुण-तरुणींकडील मोबाईल, रोख रक्कम तसेच मौल्यवान वस्तू हिसकावून घेऊन संशयित पलायन करीत होते.

तरुण-तरुणींनी राजारामपुरी पोलिस ठाण्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजसह अन्य माहीतगारांच्या आधारे संशयितांची माहिती काढली. शनिवारी पहाटे मोरेवाडी येथे जाऊन दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत संशयितांकडून 11 हजार 700 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

Back to top button