

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : पूरग्रस्त नागरीकांना प्रत्यक्षात किती नुकसानभरपाई मिळणार, याचे शासन आदेश बुधवारी रात्री उशिरा राज्य शासनाने काढले. 48 तासांपेक्षा अधिक कालावधीसाठी क्षेत्र व घरे पाण्यात बुडालेली असली पाहिजेत ही अट शिथिल करण्यात आली आहे. यामुळे पूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जुलै महिन्यात महापुराने राज्यात अनेक ठिकाणी हाहाकार माजवला. घरे, पिके, जनावरे यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. शासनाने तत्काळ सानुग्रह अनुदान जाहीर केले नसल्याने पूरग्रस्तांना कोणतीच मदत मिळाली नाही. राज्य शासनाने प्रत्यक्षात पंचनामे करून पूरग्रस्तांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याचे जाहीर केले होते. मात्र, घोषणा करूनही कुणाच्याही खात्यात रक्कम अद्याप जमा झालेली
नाही.
राज्यात पूरबाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. काही जिल्ह्यांनी नुकसानभरपाईच्या रकमेची मागणी राज्य शासनाकडे केली आहे. कोल्हापूर जिल्ह्याने 440 कोटी रुपयांची अंदाजे नुकसानभरपाईची मागणी केली आहे. बुधवारी शासनाने नुकसानभरपाईची आकडेवारी जाहीर केली.
पूरग्रस्त प्रतिकुटुंबातील कपड्यांच्या नुकसानीसाठी 5 हजार रुपये व घरगुती भांडी, वस्तू यांच्या नुकसानीकरिता 5 हजार रुपये अशी एकूण 10 हजार रुपये नुकसानभरपाई मिळणार आहे. पूर्णत: नष्ट झालेल्या पक्क्या, कच्च्या घरांसाठी 1 लाख 50 हजार रुपये, अंशत: पडझड (किमान 50 टक्के) 50 हजार प्रतिघर, अंशत: पडझड (किमान 25 टक्के) 25 हजार रुपये प्रतिघर, नष्ट झालेल्या झोपड्यांसाठी प्रतिझोपडी 15 हजार रुपये, दुधाळ जनावरे 40 हजार रुपये प्रतिजनावर, ओढकाम करणारे जनावर 30 हजार रुपये, मेंढी, बकरी, डुक्कर, 4 हजार रुपये (कमाल 3 दुधाळ, 3 ओढकाम जनावरे) कुक्कुटपालन प्रतिपक्षी 50 रुपये जास्तीत जास्त 5 हजार रुपये प्रतिकुटुंब मदत मिळणार आहे. कुक्कुटपालन शेडच्या नुकसानीसाठी 5 हजार रुपये इतकी रक्कम देण्यात येणार आहे.
अधिकृत दुकानदारांना पंचनाम्याच्या आधारे नुकसानीच्या 75 टक्के रक्कम किंवा 50 हजार रुपये, टपरीधारकांना नुकसानीच्या 75 टक्के किंवा 10 हजार रुपयांपर्यंतची आर्थिक मदत देण्यात येणार आहे.