बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवा

हातकणंगले : बैलगाड्यांमुळे कुंभोज फाट्याला आलेले जत्रेचे स्वरूप.
हातकणंगले : बैलगाड्यांमुळे कुंभोज फाट्याला आलेले जत्रेचे स्वरूप.
Published on
Updated on

बैलाचे वर्गीकरण जंगली, हिंस्र प्राण्यांत नको

कोल्हापूर / हातकणंगले ; पुढारी वृत्तसेवा : शेतकर्‍यांची अस्मिता समजल्या जाणार्‍या बैलाचे वर्गीकरण जंगली, हिंस्र प्राण्यात करून राज्य व केंद्र शासनाने शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा उद्योग केला आहे. पारंपरिक बैल पळविणे या खेळास शर्यत ही उपाधी देऊन त्यावर घातलेली बंदी तत्काळ उठवावी, या मागणीसाठी जिल्ह्यात शिरोळ, हातकणंगले, आजरा, गडहिंग्लज, राधानगरी येथील तहसील कार्यालयांवर बैलगाडी शर्यतशौकिनांनी मोर्चा काढला.

हातकणंगले तालुका बैलगाडी चालक-मालक संघटनेच्या वतीने हातकणंगले तहसीलदार कार्यालयावर बैलगाड्यांसह विराट मोर्चा काढण्यात आला. मागण्यांचे निवेदन तहसीलदार प्रदीप उबाळे यांना देण्यात आले. हातकणंगले तालुक्यातील शेकडो बैलगाड्यांसह बैलगाडी चालक-मालकांनी या मोर्चात सहभाग घेतला होता. त्यामुळे सांगली-कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली. यावेळी हातकणंगलेचे पोलिस निरीक्षक के. एन. पाटील यांनी मोर्चाला थांबविण्याचा प्रयत्न केल्यामुळे मोठा वादाचा प्रसंग निर्माण झाला.

कुंभोज फाटा येथून मोर्चास सुरुवात झाली. 'शर्यतीवरील बंदी उठवा..', 'पेटा हटवा, बैल वाचवा..', 'बैल संस्कृती वाचली पाहिजे..', आदी घोषणांनी आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला.

यावेळी आ. प्रकाश आवाडे म्हणाले, केंद्र व राज्य शासनाने आमची संस्कृती टिकवण्याऐवजी त्याला चुकीच्या चाकोरीत बसविले आहे. बैल आमचा देव असून आम्ही त्याची पूजा-अर्चा करतो. अनेक वर्षे सुरू असलेला बैल पळवणे हा खेळ तत्काळ सुरू करून शेतकरी बांधवांना न्याय द्यावा. अन्यथा कायदा हातात घेऊन न्याय मिळवण्यात येईल, असा त्यांनी इशारा दिला.

यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर लढा तीव्र करू, असे मत अनेकांनी व्यक्‍त केले. जि. प. सदस्य अशोकराव माने, राहुल आवाडे, संभाजी नाईक, बंडा हवालदार यांनी मनोगत व्यक्‍त केले. आ. राजू आवळे, संदीप कांबळे, तय्यब मुजावर, संदीप कारंडे, शकील आत्तार, आप्पासो एडके, बी.एल.शिंगे, नामदेव खोत, संजय मल्हार, तुकाराम जानकर, श्रीकांत रांगोळे, आकाश भिसे, सुरेश इरकर, गजानन नलगे, बाळासो पाटील आदी उपस्थित होते.

काही राजकीय नेत्यांनी मोर्चा केला 'हायजॅक'

शेतकरी बैलगाडी चालक-मालक यांना बाजूला सारत तालुक्यातील काही राजकीय नेत्यांनी मोर्चा हायजॅक केल्याचे चित्र पाहायला मिळाले. जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे प्रतिनिधी समजणार्‍या लोकप्रतिनिधींनी शेतकर्‍यांच्या आंदोलनाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांतून नाराजी व्यक्‍त होत होती.

बैल, घोडागाडी शर्यतीची परंपरा सुरू ठेवावी

शिरोळ : पुढारी वृत्तसेवा

हातकणंगले : बैलगाड्यांमुळे कुंभोज फाट्याला आलेले जत्रेचे स्वरूप.
हातकणंगले : बैलगाड्यांमुळे कुंभोज फाट्याला आलेले जत्रेचे स्वरूप.

छत्रपती राजाराम महाराज व शाहू महाराज यांनी सुरू केलेली बैल व घोडागाडी शर्यतीची परंपरा कायम सुरू ठेवावी, बैलाला जंगली प्रांण्याच्या यादीतून काढून टाकावे, बैल व घोडागाडी शैर्यती कायम कराव्यात, 'पेटा'चा अहवाल कायमस्वरूपी रद्द करावा आदी मागण्यांसाठी बुधवारी शिरोळ तालुक्यातील बैल व घोडा-गाडी शैर्यतशौकिन शेतकर्‍यांनी पश्‍चिम महाराष्ट्र राजर्षी शाहू बैलगाडी रेसिंग असोसिएशन मार्फत मोर्चा काढला.

येथील बुवाफन मंदिराच्या पटांगणात झालेल्या सभेत बैलगाडी शर्यती सुरू करण्यासाठी येत्या चार दिवसांत व्यापक बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल. त्यानंतर खासदार, आमदार व मंत्री यांच्या घरावर मोर्चे काढण्यात येतील, असा इशारा देण्यात आला.

दरम्यान बैल व घोडा-गाडी शर्यतीचे आंदोलन, मोर्चा निघताच कामा नये, असा आदेश जिल्हा पातळीवरून काढण्यात आल्याने पोलिसांनी नृसिंहवाडी, शिरटी, घालवाड, अर्जुनवाड, धरणगुत्ती, जयसिंगपूर, नांदणी नाका अशा प्रमुख ठिकाणी नाकाबंदी करून बैल व घोडागाडी मोर्चासाठी निघालेल्या आंदोलकांना तब्बल दोन तास थांबवून ठेवले होते. त्यामुळे आक्रमक झालेल्या असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी मोर्चा काढण्याची भूमिका घेतली.

आंदोलनाला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही. पोलिस प्रशासनाला सहकार्य केले जाईल, असे आश्‍वासन दिल्यानंतर पोलिसांनी सकारात्मक भूमिका घेतली; मात्र पोलिसांनी घोडा व बैलगाड्या तहसील कार्यालयापर्यंत जाऊ दिल्या नाहीत.

मोर्चाचे नेतृत्व बैलगाडी रेसिंग असोसिएशनचे अध्यक्ष अनिलराव यादव व पृथ्वीराज यादव यांनी केले. मागणीचे निवेदन नायब तहसीलदार पी. जी. पाटील यांनी स्वीकारून आपल्या मागण्या वरिष्ठ पातळीवर पाठवून न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे आश्‍वासन शिष्टमंडळाला दिले. मोर्चात 200 हून अधिक बैल व घोडागाडी सहभागी झाल्या होत्या.

शेतकर्‍यांची एकजूट

बैलगाडी व घोडागाडी शर्यत ही महाराष्ट्राची परंपरा आहे. या शर्यतींना कित्येक वर्षांचा इतिहास आहे. शेतकरी कधीही मुक्या प्राण्यांवर अत्याचार करीत नाहीत. असे असताना बैलगाडी, घोडागाडी शर्यतींवर बंदी घालण्यात आली आहे. याबाबत शेतकरी, शर्यत शौकिनांची भूमिका विचारात घेण्याची गरज आहे, असे मत उपस्थित शेतकर्‍यांनी व्यक्‍त केले.

आम्ही नेहमीच कायद्याच्या चौकटीत राहूनच शर्यती करतो. कायद्याचे तंतोतत पालन करतो. त्यामुळे लवकरात लवकर शर्यतींवरील बंदी उठवण्यात यावी, अशी आमची रास्त मागणी आहे. बंदी उठवली नाही, तर अधिक तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी शेतकर्‍यांनी दिला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news