अकरावी प्रवेश घेण्यासाठी 21 ऑगस्ट रोजी होणारी सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. अकरावीला प्रवेश कसे होणार, हे अद्याप निश्चित झालेले नाही. तरी यंदा चांगल्या कनिष्ठ महाविद्यालयांत प्रवेश मिळविण्यासाठी मोठी चुरस असणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली. अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे 16 जुलै रोजी दहावीचा ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला. त्यानंतर गुणपत्रकांचे वाटप सुरू झाले आहे. अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. शंभर गुणांची दोन तास कालावधीची ही परीक्षा ऐच्छिक स्वरूपाची ठेवण्यात आली. त्यानुसार 20 जुलैनंतर राज्य मंडळाकडून सीईटी परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन सुरू झाले. 2 ऑगस्ट रोजी ही प्रक्रिया संपली. त्यानंतर परीक्षेसाठी केंद्रनिश्चितीचे काम विभागीय मंडळाकडून सुरू झाले.
कोल्हापूर विभागातून यावर्षी सुमारे 1 लाख 39 हजार 543 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात कोल्हापूर जिल्ह्यातील दहावीच्या सुमारे 55 हजार 784 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शहरात 35 कनिष्ठ महाविद्यालये असून, सुमारे 14 हजार 600 अकरावीची प्रवेश क्षमता आहे.
दरम्यान, सीईटी परीक्षेसंदर्भात सुनावणी होऊन उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल देत सीईटी परीक्षा रद्द केली आहे. अकरावी प्रवेशासाठी पुढे काय करता येईल, याचा अभ्यास करत आहे. उच्च न्यायालयाचा निर्णय पाहून पुढील निर्णय घेऊ, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे अकरावीच्या प्रवेशाबाबत विद्यार्थी, पालकांची चिंता वाढली आहे.
न्यायालयाचा अधिकृत निकाल व शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचना येत नाहीत तोपर्यंत अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाणार नाही. कनिष्ठ महाविद्यालयांनीही कोणत्याही प्रकारची अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबवू नये.
– सुभाष चौगुले, सचिव, शहरस्तरीय अकरावी केंद्रीय प्रवेश प्रक्रियावर्षभर अभ्यास करून दहावीची परीक्षा कोरोनामुळे रद्द करण्यात आली. आता सीईटीसाठी रजिस्ट्रेशन करून अभ्यासही सुरू केला होता. परंतु, ही परीक्षादेखील रद्द करण्यात आली. सीईटी परीक्षा व्हायला हवी होती. त्यामुळे क्षमता लक्षात आली असती व अभ्यास केल्याचे समाधान मिळाले असते.
– स्वप्निल शेटे, कौतुक विद्यालय, शिरोलीकोरोना काळात प्रत्यक्ष परीक्षा घेणे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. शाळा व शिक्षकांकडून योग्य पद्धतीने अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे दहावीचा निकाल लावला आहे. सद्यस्थिती पाहता सीईटी घेण्याची आवश्यकता वाटत नाही. न्यायालयाने विद्यार्थी हिताचा निर्णय दिला आहे.
– जयसिंग देवकर, माध्यमिक शिक्षकअभ्यास करूनही सीईटी परीक्षा रद्द केल्याचे वाईट वाटत आहे. आधीच कोरोना संकटामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहेत. विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय असला, तरी सीईटी परीक्षा होणे आवश्यक होते.
– खुशी बांदेकर, नानासाहेब गद्रे हायस्कूल