हत्ती…गजराज आले… संयम, शिस्तीत निघूनही गेले..! | पुढारी

हत्ती...गजराज आले... संयम, शिस्तीत निघूनही गेले..!

सोहाळे : सचिन कळेकर

हत्ती म्हणजे गजराज. त्याला साक्षात गणेशाचे रूप मानले जाते. अतिशय बद्धिमान प्राणी, अशी त्याची आणखी एक ओळख. आजरा तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून दोन टस्कर हत्तींचा वावर आहे.

दोन दिवसांपूर्वी असाच एक टस्कर हत्ती वाट चुकून खोराटवाडी परिसरात आला. बघता बघता बघ्यांची गर्दी झाली; पण न बिथरता तो वाट शोधू लागला. माणसांच्या जंगलात भरकटला असला, तरी तो संयम आणि शिस्त विसरला नव्हता. वाटेत आलेली घरेदारे, वाहने, गायी, म्हशी अशी जनावरे यांना स्पर्शही न करता तो जसा आला तसाच वाट शोधून निघून गेला. हत्तीच्या या कृतीची सर्वसामान्यांत चांगलीच चर्चा आहे.

हत्ती
वाट चुकलेला टस्कर बिथरला नाही. बाजूला कच्चेपक्के घर आहे, समोर एक मोटार आहे; पण त्याला स्पर्शही न करता टस्कर आपल्या वाटेने पुढे गेला. (सर्व छाया : सृष्टी फोटो)

आजरा तालुक्यातील मसोली, वेळवट्टी, देवर्डे, गवसे, आल्याचीवाडी, सुळेरान,घाटकरवाडी यासह पश्चिम भागात एक लहान व एक मोठा अशा दोन टस्करांचा वावर आहे. टस्करांनी ऊस, केळी, नारळ, मेसकाठी, भात, फणस आदी पिके फस्त केली; पण ते फक्त पोटाची भूक भागवण्यासाठी…

महापुराच्या काळात दरम्यान लहान टस्कर हत्ती सुलगाव, चांदेवाडी, पेद्रेवाडीमार्गे शिरसंगी परिसरात गेला होता. चार दिवसापुर्वी हा टस्कर पुन्हा आपल्या अधिवासाकडे परतत होता. वाट चुकून त्याने भर दिवसा आजरा-गडहिंग्लज मार्गावरुन प्रयाण केले. रविवारी सकाळी भादवणवाडीपासून खोराटवाडी, भादवण, मडिलगे, खेडे, हाजगोळी, सोहाळेमार्गे रामतीर्थ येथून नदी पार करुन पारेवाडी परिसरातून मुळ अधिवास असलेले चाळोबा जंगल असा त्याने प्रवास केला.

तब्बल 9 तास टस्कर मार्गक्रमण करत होता. टस्करने खोराटवाडीपासून सोहाळे गावापर्यंत आजरा-गडहिंग्लज मुख्य मार्गावर अनेकवेळा दर्शन दिले. खोराटवाडी व मडिलगे येथे तर टस्करने रस्त्यावरुनच रपेट केली. टस्करच्या मुक्त संचारच्या संपुर्ण कालावधीत शेकडो लोकांचा जमाव त्याच्यामागे होता.

हत्ती
हिरण्यकेशी नदीच्या पलीकडे असलेले जंगल आपले आहे, हे लक्षात आल्यावर टस्कर शहाण्या मुलासारखा पोहून नदीपलीकडे गेला; पण या पाच ते सहा तासांच्या त्याच्या माणसांच्या जंगलातल्या वास्तव्यात त्याने एका काडीचेही नुकसान केले नाही.

टस्कर आल्याचे समजताच लहानांपासून वयोवृध्द नागरिकांनी पाहण्यासाठी प्रयत्न केला. तरुणवर्ग तर आपल्या मोबाईलमध्ये टस्करचे चित्रण कैद करण्यात मग्न होता. अनेकांची आरडाओरड सुरु होती. काही तरुणांनी वनविभागाला मदतही केली. या सर्व प्रकारात वनक्षेत्रपाल स्मिता डाके यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे कर्मचारी मात्र टस्करला आपल्या अधिवासात घालविण्यासाठी मोठे प्रयत्न करताना दिसून आले. टस्करला सांभाळण्याऐवजी लोकांना सांभाळण्यातच वनविभागाच्या कर्मचार्‍यांची दमछाक झाली.

जमावाचा दंगा सुरू असतानाही टस्करने संयम आणि शिस्त या दोन गोष्टींचे पालन करत आपला प्रवास सुरु ठेवला. कोणतेही नुकसान केले नाही. यावरुन वन्यप्राण्यांमध्ये असलेली शिस्त स्पष्ट होते. यावरुन माणसानेही आपल्या सवयीमध्ये बदल करुन वन्यप्राण्यांसोबत सहजीवन स्विकारण्याची गरज अधोरेखित होते.

नागरिकांनी सहकार्य करावे : डेळेकर

जंगल भागात मानवी हस्तक्षेप वाढला आहे. परिणामी, वन्यप्राणी नागरी वस्तीकडे वळू लागले आहेत. नागरी वस्तीजवळ आल्यास वन्यप्राण्याला त्रास होणार नाही याची नागरिकांनी दक्षता घ्यावी. तत्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन कोल्हापूर वनरक्षक, वनपाल संघटनेचे कार्याध्यक्ष कृष्णा डेळेकर यांनी केले आहे.

Back to top button