पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संस्थांचे अतिक्रमण प्रथम हटवा | पुढारी

पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संस्थांचे अतिक्रमण प्रथम हटवा

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : पालकमंत्री सतेज पाटील यांच्या संस्थांचे अतिक्रमण प्रथम हटवा मगच सर्वसामान्यांच्या अतिक्रमणास हात घाला, अशी मागणी माजी महापौर सुनील कदम आणि सत्यजित कदम यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

कदम म्हणाले, पालकमंत्री सतेज पाटील यांनी कदमवाडी येथील डीपी रस्त्यावर अतिक्रमण करून रस्ता बंद केला आहे. तर कसबा बावडा येथील त्यांच्या संस्थेच्या कमर्शियल इमारतीचा घरफाळा 21 वर्षं थकीत आहे. त्या इमारतीचे बंदिस्त पार्किंग आहे. या अतिक्रमणावर प्रथम कारवाई करावी मगच सर्वसामान्यांच्या अतिक्रमणास हात घालावा. पालकमंत्र्यांच्या आशीर्वादाने मार्केट यार्डातील महापालिकेच्या रस्त्याची विक्री करून रस्त्यावर 13 केबिन उभारल्या असून, यामध्ये आर्थिक उलाढाली झाल्या आहेत. राजारामपुरीत अगोदर कारवाई आणि नंतर नोटिसा पाठवण्यात आल्या. पालकमंत्री पाटील यांच्या दबावाखाली महापालिका प्रशासन काम करत आहे. ओबीसी समाजास न्याय देण्यासाठी महापालिका निवडणुकीसाठी 31 मे रोजी काढण्यात येणारी आरक्षण सोडत शासनाने पुढे ढकलावी, अशी मागणीही कदम यांनी केली.

कदम म्हणाले, निवडणुकांनंतर डाटा सादर करणे म्हणजे ओबीसी समाजाच्या तोंडास पाने पुसण्याचा प्रकार मंत्री मुश्रीफ यांनी केला आहे. या सर्व प्रकारांविरोधात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार आहे, असे कदम यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला माजी नगरसेवक विजय सूर्यवंशी, अजित ठाणेकर, राजसिंह शेळके उपस्थित होते.

Back to top button