तामगावात जुगार अड्ड्यावर छापा; आठ अटकेत | पुढारी

तामगावात जुगार अड्ड्यावर छापा; आठ अटकेत

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : तामगाव (ता. करवीर) येथील पाटील माळ परिसरात अविनाश राजेंद्र भिसे याच्या घरात चालणार्‍या तीनपानी जुगार अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे अन्वेषणने छापा टाकून अड्डा मालकांसह 8 जुगार्‍यांच्या मुसक्या आवळल्या. रविवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. 39 हजारांची रोकड, मोबाईल, दुचाकी असा 1 लाख 39 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अविनाश भिसे (वय 24, रा. एलोरा पार्क, सम्राटनगर), अनिल आनंदा वड्ड (40, राजारामपुरी), अमोल अनिल पाटील (31, पलूस, सांगली), हणमंत लक्ष्मण गाडीवडर (40), तानाजी कृष्णा मोरे (37, दोघे रा. दौलतनगर), दगडू दादू पोवार (45, सुभाषनगर), अनिकेत बळवंत कदम (26), राहुल रामचंद्र कोळी (24, दोघे यवलूज, पन्हाळा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. संशयितांच्या कब्जातील 39 हजारांची रोकड, पत्त्याची पाने, 6 मोबाईल हँडसेट, 3 दुचाकी व जुगाराचे साहित्य असा 1 लाख 39 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे पोलिस निरीक्षक संजय गोर्ले यांनी सांगितले.

नागरिकांची तक्रार बेदखल
नागरिकांच्या तक्रारीनंतरही अड्ड्यांवर गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याकडून कारवाई होत नव्हती. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या आदेशानुसार अड्ड्यांवर रविवारी रात्री उशिरा छापा टाकून कारवाई केली.
संशयितांविरुद्ध गोकुळ शिरगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Back to top button