पर्यटक, भाविकांच्या गर्दीने कोल्हापूर फुलले | पुढारी

पर्यटक, भाविकांच्या गर्दीने कोल्हापूर फुलले

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : उन्हाळी सुट्ट्या आणि साप्ताहिक सुट्टीमुळे रविवारी कोल्हापुरात पर्यटक-भाविकांची मोठी गर्दी झाली होती. यामुळे शहरात असणारी ठिकठिकाणची पार्किंग हाऊसफुल्ल झाल्याने अनेक रस्त्यांच्या दूतर्फा पर्यटकांची वाहने पार्क करण्यात आली होती. पर्यटक आणि त्यांच्या वाहनांमुळे शहरात ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.

शनिवारी रात्रीपासूनच पर्यटक कोल्हापूरात येऊ लागले होते. दिवसभर आणि रात्री उशिरापर्यंत पर्यटकांची ये-जा सुरूच होती. यामुळे शहरातील बहुतांश पार्किंग हाऊसफुल्ल झाली होती. यामुळे बिंदू चौक, शिवाजी रोड, टेंबे रोड, दसरा चौक, ताराबाई व रंकाळा रोडसह ठिकठिकाणी रस्त्यांच्या दुतर्फा वाहनांचे पार्किंग करण्यात आले होते.

करवीर निवासिनी अंबाबाई, जोतिबा यासह विविध धार्मिक स्थळे, पन्हाळा-विशाळगडासह विविध गड-किल्ले, न्यू पॅलेस, जुना राजवाडा, राजर्षी शाहू जन्मस्थळ व समाधी स्थळ, खासबाग मैदान, साठमारी, रंकाळ तलाव, पंचगंगा नदी घाट, कळंबा तलाव, शिवाजी विद्यापीठ अशा पर्यटन स्थळांवर दिवसभर पर्यटकांची रेलचेल सुरू होती. यामुळे शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंटस्, खाऊ गल्ल्यांमध्येही गर्दी दिसत होती. स्थानिकांना साप्ताहिक सुट्टी असल्याने गर्दीत अधिकच वाढ झाली होती.

पोलिस व देवस्थान समिती दक्ष
पोलीस विभाग व देवस्थानची सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाच्या दक्षतेमुळे चोरीच्या प्रकारांवर आळा घालण्यात आला आहे. गर्दीत हरवलेल्या लहान मुले व वृद्धांना स्पीकर सिस्टीमच्या माध्यमातून त्यांच्या नातेवाईकांना भेटवण्याचे कामही सुरळीत सुरू आहे.

Back to top button