

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : गेली तीन वर्षे कोल्हापूर शहराला महापुराचा वेढा पडत आहे. त्यासंदर्भातील माहिती महापालिका प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकार्यांना दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिका निवडणुकीची रणधुमाळी पावसाळ्यानंतर होण्याची शक्यता आहे.
महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका पावसाळ्यानंतर घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज केला होता. त्यावर न्यायालयाने जास्त पाऊस नसलेल्या ठिकाणी निवडणूक घेण्यास काय हरकत आहे? अशी विचारणा आयोगाकडे केली आहे. त्यानुसार जास्त पाऊस नसलेल्या राज्यातील इतर ठिकाणी निवडणुका होऊ शकतात.
कोल्हापूर महापालिकेची मुदत 15 नोव्हेंबर 2020 रोजी संपली आहे. कोरोनामुळे निवडणूक झाली नाही. आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीसाठी बहुपद्धतीय अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली आहे. लवकरच आरक्षण सोडतही काढण्यात येणार आहे. त्यानंतर मतदार याद्यांचे काम सुरू केले जाणार आहे.
कोल्हापुरात दरवर्षी महापुराचा फटका बसतो. नागरी वस्तीत पुराचे पाणी घुसते. त्यामुळे पावसाळ्यात कोल्हापुरात महापालिका निवडणूक घेणे अशक्य आहे, असे अधिकार्यांचे मत आहे. ईव्हीएम मशिनच्या सुरक्षिततेबरोबरच त्याची वाहतूक, मतदानाच्या दिवशीच अतिवृष्टी झाल्यास मतदार मतदानासाठी बाहेर पडू शकणार नाहीत. त्यामुळे पावसाळा संपल्यानंतर निवडणूक होण्याची शक्यता आहे.