कोल्हापूर : वीज मीटरचा तुटवडा; ग्राहकांची लूट | पुढारी

कोल्हापूर : वीज मीटरचा तुटवडा; ग्राहकांची लूट

कोल्हापूर; सुनील सकटे : राज्यातील बहुतांश भागात वीज मीटरचा तुटवडा आहे. त्यामुळे नवीन ग्राहकांना बाजारातून दुपटीहून अधिक किमतीत वीजमीटर खरेदी करावे लागत आहे. महावितरणकडे मीटर उपलब्ध नसल्याने खुल्या बाजारात मात्र ग्राहकांची अक्षरश: लूट सुरू आहे.

राज्यात 50 कोटींच्या जवळपास वीज ग्राहक आहेत. एवढेच नाही तर रोज नवीन ग्राहकांची भर पडत आहे. नवीन ग्राहकांना वीजजोडणीसाठी वीज मीटर उपलब्ध नसल्याने प्रतीक्षा करावी लागत आहे. महावितरण कंपनी 800 रुपयांत उपलब्ध करून देणारे वीज मीटर खुल्या बाजारात दीड ते दोन हजारांना खरेदी करावे लागत आहे. दरम्यान, महावितरणने ग्राहकांना खुल्या बाजारातूनही नवीन मीटर खरेदी करण्याची मुभा दिली आहे. हे मीटर महावितरणच्या प्रयोगशाळेत तपासल्यावर कार्यान्वित केले जातात.

सिंगल फेज मीटर खुल्या बाजारात 1500 तर थ्री फेज 2300 रुपयास मिळत होते. परंतु, आता सिंगल फेज मीटर 3 हजारांपर्यंत तर थ्री फेज मीटर 4 हजार रुपयांपर्यंत विकले जात आहेत. ग्राहकांनी खुल्या बाजारातून मीटर खरेदी केल्यावर महावितरणकडून ग्राहकांना सिंगल फेज मीटर असल्यास महावितरण ग्राहकाला 850 रुपये, तर थ्री फेज मीटर असल्यास 1,520 रुपये परतावा मिळतो. प्रत्यक्षात मात्र दुप्पटीहून जास्त किमतीत ग्राहकांना मीटर असल्याने ग्राहकांवर अतिरिक्त भार पडत आहे.

जिल्ह्यात पाच हजार ग्राहक प्रतीक्षेत

कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता शहर विभागातील 25 शाखा कार्यालयांमध्ये प्रत्येकी 25 ते 30 अर्ज प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे शहरात किमान 500 ते 600 ग्राहक मीटरच्या प्रतीक्षेत आहेत. तर जिल्ह्यात पाच हजारांवर ग्राहक मीटरच्या प्रतीक्षेत आहेत.

Back to top button